खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याल

मुंबई: नीट (NEET) पेपर फुटीविरोधात मुंबईतील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांच्या गाडीतच अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात (Police Threats Students) अडकवण्याची धमकी दिल्याचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत मुंबई पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. एक पोलीस तरुणाला धमकावताना दिसताना व्हिडीओमध्ये दिसतो. पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन अशी धमकी देतोय. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची (Police Threats Students) धमकी देऊन कारवाई करण्याची भिती घालणारा तो काॅन्स्टेबल मुंबई पोलिसांच्या सायन पोलिस पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तो व्हिडिओ बुधवारचा असून त्या चालकाची तात्काळ बदली करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.(Police Threats Students)

तर काही वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, पवन सांगळे असं या पोलीस काॅन्स्टेबलचं नाव आहे. सायन पोलीस स्टेशनला तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. या व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांच्या कारवाईवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या पवन सांगळेची बदली केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.(Police Threats Students)

Police Threats Students : काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

‘दहिसरकर’ या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या गाडीत काही आंदोलनकर्ते विद्यार्थी बसलेले दिसत आहेत. विद्यार्थी शांत न बसल्याने पोलीस गाडीतील एक कर्मचारी त्यांना थेट धमकी देताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. “पुन्हा आंदोलन करताना दिसलात तर ५० ग्रॅम पावडर (ड्रग्स) खिशात टाकू आणि अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून आत टाकू. पुन्हा आलात तर माझ्यासारखं वाईट कोणी असणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत हा पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना धमकावताना ऐकू येत आहे.(Police Threats Students)

Police Threats Students : या प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. हर्षवर्धवन सपकाळ, नसीम खान, भाई जगताप हे मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेणार आहेत, या प्रकरणी माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, जो विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू आहे. ⁠तरुणाई रस्त्यावर उतरून आली आहे, असे असताना पोलिसांचं हे वागणं योग्य नाही. गुंडागर्दी ऐवजी आता पोलिस गर्दी सुरु आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. ⁠हे पोलिस महासंचालक यांना सांगितलं, अंमला पदार्थांचा व्यापार पोलिस करत आहेत, हे या व्हिडीओच्या माध्यमातून हे समोर येत आहे. पोलिस सांगत आहे की, या पोलिसाची चौकशी सुरू झाली आहे. आम्ही त्यांना ⁠पोलिस राज कसं सुरु आहे याची डिटेल माहिती दिली. सर्व पोलिस अधीक्षक आणि अधिकारी यांची उद्या बैठक बोलावली आहे, ⁠गृह विभागाचा कारभार पांडू हवालदार चालवत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

Police Threats Students : सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुंबईत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. लाठीहल्ल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना थेट खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओमध्ये, “तुमच्या खिशात ड्रग्जच्या पुड्या ठेवून तुरुंगात टाकेन,” अशी उघड धमकी मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी आंदोलक तरुणांना देताना दिसत आहे.हे कृत्य अतिशय विकृत, तितकेच निषेधार्ह आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारे आहे. ज्या मुंबई पोलिसांवर अंमली पदार्थांचा व्यापार मुळापासून उखडण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, तेच पोलीस विद्यार्थ्यांना धमकावण्यासाठी ड्रग्जचा वापर करण्याची भाषा करत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे.

या घटनेमुळे काही  प्रश्न उपस्थित झाले आहेत.

१. पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? जर पोलीस खुलेआम विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी देत असतील, तर त्यांना ड्रग्जचा स्त्रोत ठाऊक आहे. जर हा स्त्रोत माहिती आहे, तर मुंबईतील ड्रग्ज माफियांवर कारवाई का केली जात नाही?

२. राज्य सरकारला ही गुंडगिरी मान्य आहे का? मुंबई पोलीस दल हे थेट राज्याच्या गृह मंत्रालयाखाली येते. राज्याच्या राजधानीत आणि सरकारच्या नाकाखाली सुरू असलेला हा प्रकार गृह खात्याला मान्य आहे का?

आंदोलक मुलांना अशा प्रकारे बनावट पुराव्यांची आणि ड्रग्जची धमकी देणे हा भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मानवाधिकार कायद्यांनुसार अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.

खोटे पुरावे तयार करणे किंवा कोणालातरी खोट्या व गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठी पुरावे रचणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अंमली पदार्थ बाळगणे, त्याचा व्यापार करणे किंवा कोणाला तरी अडकविण्यासाठी त्याचा गैरवापर करणे हा देखील गुन्हा आहे.

हा प्रकार मानवाधिकाराचेही उल्लंघन आहे. मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ अंतर्गत नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगण्याचा आणि आपली मते मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. पोलिसांचे हे कृत्य राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उघड उल्लंघन आहे.

आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या देशाच्या तरुण पिढीला गुन्हेगार ठरवण्याचा आणि त्यांच्या खिशात ड्रग्ज टाकून त्यांचे आयुष्य व करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्याचा हा प्रकार अत्यंत भयावह आहे.

संबंधित व्हिडिओतील पोलीस कर्मचाऱ्यावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच, राज्याच्या गृह मंत्र्यांनी यावर मौन न बाळगता महाराष्ट्रातील जनतेला आणि त्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तर द्यायलाच पाहिजे.

पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धमक्या : सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

हे मुंबई पोलीस आहेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीत घालून धमकी काय देत आहेत बघा, ” पुन्हा या ठिकाणी दिसायचं नाही,  दिसला तर तुमच्या खिशामध्ये 50-50 ग्रॅम ड्रग्स च्या पुड्या टाकेन…”  याच्यावर सरकारचं काय म्हणणं आहे…

Comments are closed.