WTC 2027 च्या अंतिम सामन्याची तारीख आणि मैदान निश्चित; लंडनच्या ‘द ओव्हल’वर रंगणार महासंग्राम
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या अंतिम सामन्याची वेळ आणि ठिकाण घोषित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट जगतातील ही प्रतिष्ठेची फायनल पुढील वर्षी बुधवार, 9 जून ते रविवार, 13 जून या कालावधीत लंडनच्या ऐतिहासिक ‘द ओव्हल’ मैदानावर खेळवली जाईल.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला आगामी 2027, 2029 आणि 2031 या सलग तीन डब्ल्यूटीसी फायनलचे यजमानपद मिळाले आहे. त्यानुसार 2027 च्या या विशेष सामन्यासाठी ‘द ओव्हल’ची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी 2023 च्या अंतिम सामन्याचे यजमानपदही याच मैदानाकडे होते. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा पराभव करत विजेतेपदाची गदा पटकावली होती.
2027 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल अत्यंत खास असणार आहे. कारण याच वर्षी टेस्ट क्रिकेट आपली 150 वर्षे पूर्ण करत आहे. ‘द ओव्हल’चा क्रिकेटच्या इतिहासात मोठा वाटा राहिला असून ईसीबीसोबत मिळून आम्ही हा सामना जगभरातील चाहत्यांसाठी अविस्मरणीय बनवू, आयसीसीचे जनरल मॅनेजर (इव्हेंट्स अँड ऑपरेशन्स) गौरव सक्सेना यांनी दिली.
फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 9 संघांमध्ये चुरस
दरम्यान, सामन्याची तारीख जाहीर झाली असली तरी अंतिम फेरीत कोणते दोन संघ धडक मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या गुणतालिकेत आघाडी मिळवण्यासाठी सर्व 9 देशांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या आधाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने 8 पैकी 7 सामना जिंकले असून दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या, बांग्लादेश पाचव्या आणि हिंदुस्थान सहाव्या स्थानावर आहे. त्याखाली श्रीलंका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा संघ आहे.
याआधी कुणी जिंकले विजेतेपद?
- 2021 – न्यूझीलंड (विजेता)
- 2023 – ऑस्ट्रेलिया (विजेता)
- 2025 – दक्षिण आफ्रिका (विजेता)
लंडनमधील एक प्रतिष्ठित मैदान पुढील वर्षीचे ठिकाण म्हणून निश्चित करण्यात आले आहे #WTC27 अंतिम 🌟https://t.co/Ee62S7i8uA
— ICC (@ICC) 23 जुलै 2026
Comments are closed.