म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

मुंबई: नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिक शहर परिसरातील पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, मखमलाबाद शिवार, चुंचाळे शिवार, आडगाव शिवार, सातपुर शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, तपोवन लिंक रोड, सामनगाव रोड, आगर टाकळी शिवार, गंगापूर शिवार, सिन्नर फाटा, देवळाली शिवार, चेहडी, मेरी-रासबिहारी लिंक रोड, वडाळा शिवार येथे म्हाडा गृहनिर्माण योजना व 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील विविध गृहप्रकल्पांतील 744 सदनिका व भुसावळ (जि. जळगाव) येथील 02 भूखंड विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते नुकताच ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.नाशिक मंडळाच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, उपमुख्य अधिकारी प्रवीण बागूल, मिळकत व्यवस्थापक नितिन कुलथे आदी उपस्थित होते.

744 घरांच्या विक्रीसाठी सोडत

रंजन ठाकरे यांनी नाशिक मंडळाच्या सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले की,  नाशिक मंडळाच्या या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 412 सदनिका तर म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 332 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  म्हाडाच्या सोडतीसाठी तयार करण्यात आलेल्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच व म्हाडा लॉटरी ॲपवरुन इच्छुक अर्जदारांनी अर्ज करावा. मंडळातर्फे सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास नाशिक मंडळ अथवा म्हाडा प्रशासन कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही.  म्हाडाची IHLMS 2.0 ही संगणकीय प्रणाली अत्यंत पारदर्शक , सोपी व सुलभ आहे करिता इच्छुक अर्जदारांनी याच सोडत प्रणालीच्या सहाय्याने सोडत प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा. नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेपास वाव नाही, असेही रंजन ठाकरे यांनी सांगितले.

शिवकुमार आवळकंठे यांनी इच्छुक अर्जदारांना आवाहन केले की, अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, यामध्ये अर्ज प्रक्रियेची नियमावली, मार्गदर्शक सूचना, सोडतीविषयी संपूर्ण माहिती , सदनिकांचा तपशील सारख्या सर्व बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. सदर पुस्तिका म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे शिवकुमार आवळकंठे यांनी सांगितले.

20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिका सोडतीकरिता दिनांक 28 जुलै, 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी व नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज  सादर करता येणार आहे. दिनांक 28 जुलै, 2026 रोजी रात्री 11.59 पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. दिनांक 29 जुलै, 2026 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक 11 ऑगस्ट, 2026 रोजी सायंकाळी 06.00 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे.

म्हाडा गृहनिर्माण योजनेतील सदनिका सोडतीकरिता दिनांक 20 ऑगस्ट, 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी व नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दिनांक 20 ऑगस्ट, 2026 रोजी रात्री 11.59 पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. दिनांक 21 ऑगस्ट, 2026 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक 04 सप्टेंबर, 2026 रोजी सायंकाळी 06.00 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे.  सोडतीचा दिनांक व स्थळ संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.