सहकाराची माहिती नसलेला खेडचा माणूस जिल्हा बॅंकेवर टीका करतोय, नाव न घेता डॉ.तानाजीराव चोरगे यांनी रामदास कदमांना फटकारले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खेडमधील एक माणूस ज्याला सहकारातील माहिती नाही तो टिका करतोय. 2000 साली मी पहिले कृषी महाविद्यालय सुरू केले तेव्हा मी जिल्हा बॅंकेचा संचालकही नव्हतो मग मी बॅंकेवर दबाव कसा टाकला? असा सवाल विचारत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी शिंदे गटाचे माजी आमदार रामदास कदम यांचा नाव न घेता समाचार घेतला. ते आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

जिल्हा बँकेची सर्व साधारण सभा आज जयेश मंगल सभागृहात पार पडली. यावेळी डॉ.तानाजीराव चोरगे म्हणाले की,2007 साली जेव्हा जिल्हा बॅंकेचा मी अध्यक्ष झालो तेव्हा 63 टक्के एनपीए होता. त्यानंतर आम्ही काटकसर आणि कामकाजात शिस्त आणून बॅंक नफ्यात आणली. आज बॅंकेचा एनपीए शून्य टक्के झाला आहे. 94 कोटी रुपये नफा झाला आहे. आमच्या एकाही संचालकांने बॅंकेकडून कर्ज घेतले नाही. आज बॅंक सुस्थितीत असून यापुढे येणाऱ्या संचालक मंडळाने बॅंक व्यवस्थित चालवावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सहकारात कोणतेही राजकारण आम्ही करत नाही असे सांगताना रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीचे त्यांनी अनुभव सांगितले.

संचालकांची शेवटची सभा असल्याने भावूक वातावरण

नव्या सहकार नियमानुसार एका संचालकाला सलग दहा वर्षे एका सहकारी बँकेत संचालक पदावर रहाता येणार आहे. या नियमांमुळे विद्यमान अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांच्यासह 12 संचालक निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आज वार्षिक सर्वसाधारण सभेत एक भावूक वातावरण पाहायला मिळाले. तोट्यात गेलेली बॅंक नफ्यात आणून राज्यात रत्नागिरी जिल्हा बॅंक दुसऱ्या क्रमांकावर आहे याचे श्रेय डॉ.तानाजीराव चोरगे यांना दिले. त्यांनी तीन वर्षांनंतर पुन्हा बॅंकेची धुरा घ्यावी अशी मागणी अनेक सभासदांनी केली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक ॲड. दीपक पटवर्धन, नेहा माने, जयंत जालगावकर, सुधीर कालेकर, गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर गिम्हवणेकर व इतर संचालक उपस्थित होते.

Comments are closed.