मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

धुळे : देशभरात एकीकडे नीट पेपरफुटीप्रकरण आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावरुन राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. देशभरातली पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करत असतानाच शिक्षण विभागातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल 190 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक (Nashik) गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगणीकर (Crime news) (वय 66) यांना धुळे येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून शिक्षण खात्याचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत संबंधित शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील 459 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट शालार्थ आयडी तयार करून वेतन व थकबाकीची रक्कम उचलल्याचा आरोप आहे. पोलीस तपासानुसार, शशिकांत हिंगणीकर हे जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना कोणताही वैध प्रस्ताव नसताना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण घोटाळ्यात आतापर्यंत सुमारे 1,200 आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथे सापळा रचून हिंगणीकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक शहर गुन्हे शाखेकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घोटाळ्यातील इतर संबंधितांची भूमिकाही तपासली जात आहे.

नाशिकमध्येही आंदोलन

दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो तरुण-तरुणी नाशिकच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. नाशिकमधील एक कुटुंब देखील आपल्याला लहान बाळांसोबत या आंदोलनात सहभागी झाले आहे. मुलांच्या भविष्यासाठी आमचा देखील आंदोलनाला पाठिंबा असून आम्ही कोणतेही राजकीय पक्षाचे नाही तर सामान्य नागरिक म्हणून या आंदोलनात सहभागी झालो आहोत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशीच सर्वांची मागणी आहे.

हेही वाचा

काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले

Comments are closed.