15 वर्षांच्या वैभवने रचला इतिहास; असा विक्रम आजवर कुणालाच जमला नव्हता!
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या संपूर्ण मालिकेत त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत शानदार कामगिरी केली. या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ (मालिकावीर) म्हणून गौरवण्यात आले. तसेच, रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (सामनावीर) पुरस्कारही पटकावला.
अंतिम सामन्यात वैभवने 49 चेंडूंत 81 धावांची जबरदस्त खेळी केली, ज्यामध्ये 8 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 165.31 इतका होता. संपूर्ण मालिकेत त्याने तीन डावांत 151 धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी 50.33 आणि स्ट्राईक रेट 196.10 इतका प्रभावी राहिला. वैभव या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर ईशान किशनने 145 धावांसह दुसरे स्थान मिळवले.
‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू
मालिकेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल वैभव सूर्यवंशीला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जिंकून त्याने पुन्हा एकदा विक्रम नोंदवला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार जिंकणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला.
शिवाय, वयाच्या 15व्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणारा तो जागतिक स्तरावरील पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी कोणत्याही क्रिकेटपटूला अशी कामगिरी करता आली नव्हती.
एकाच मालिकेत चार जागतिक विक्रम
वैभव सूर्यवंशी ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ आणि ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हे दोन्ही पुरस्कार जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच, याच मालिकेत त्याने सर्वात कमी वयात टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावण्याचा आणि सलग अर्धशतके ठोकण्याचा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला. अशा प्रकारे, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत चार जागतिक विक्रम नोंदवून या 15 वर्षीय फलंदाजाने इतिहास रचला.
वैभव सूर्यवंशीने या महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यावेळी, भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला. तसेच, आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा जगातील दुसरा सर्वात तरुण क्रिकेटपटू होण्याचा मानही त्याने मिळवला.
Comments are closed.