Wi-Fi राऊटर घरात कुठे ठेवावा? चुकीची जागा इंटरनेटचा स्पीड कमी करू शकते

Wi-Fi हा प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनला आहे. वर्क फ्रॉम होम असो, ऑनलाइन क्लासेस, OTT वर चित्रपट पाहणे किंवा गेमिंग चांगल्या इंटरनेटशिवाय अनेक कामे अडतात. मात्र, अनेकदा इंटरनेट प्लॅन महाग असतानाही स्पीड कमी मिळतो. अशावेळी लोक लगेच इंटरनेट कंपनीला दोष देतात. पण अनेकदा समस्या इंटरनेटमध्ये नसून राऊटर कुठे ठेवला आहे हे याची असते. everything you need to know about wifi router

राऊटरची चुकीची जागा Wi-Fi सिग्नल कमकुवत करू शकते. त्यामुळे घरातील काही भागात नेटवर्क नीट मिळत नाही, व्हिडिओ सतत बफर होतो किंवा कॉलमध्ये अडथळे येतात. काही छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास इंटरनेटचा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो. जाणून घेऊयात Wi-Fi राऊटर ठेवण्याची योग्य जागा.

घराच्या मध्यभागी ठेवा
Wi-Fi सिग्नल चारही दिशांना पसरतात. त्यामुळे राऊटर घराच्या एका कोपऱ्यात ठेवला, तर सिग्नल दुसऱ्या टोकापर्यंत कमी पोहोचू शकतो. शक्य असल्यास राऊटर घराच्या मध्यभागी ठेवा, जेणेकरून सर्व खोल्यांमध्ये नेटवर्क समान प्रमाणात मिळेल.

उंच जागेवर ठेवा
अनेकजण राऊटर टीव्ही युनिटच्या आत किंवा जमिनीवर ठेवतात. त्यामुळे सिग्नलवर परिणाम होऊ शकतो. राऊटर टेबल, शेल्फ किंवा भिंतीवर उंच ठिकाणी ठेवल्यास सिग्नल अधिक चांगल्या प्रकारे पसरतात.

या वस्तूंपासून राऊटर दूर ठेवा
Wi-Fi सिग्नलवर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राऊटर मायक्रोवेव्ह ओव्हन, फ्रिज, टीव्ही, ब्लूटूथ स्पीकर्स, कॉर्डलेस फोन या वस्तूंपासून शक्यतो दूर ठेवा.

जाड भिंती आणि लोखंडी वस्तू
जाड काँक्रीटच्या भिंती, लोखंडी कपाटे किंवा मोठे आरसे Wi-Fi सिग्नल अडवू शकतात. त्यामुळे राऊटर अशा अडथळ्यांच्या मागे ठेवणे टाळा.

अँटेनाची योग्य दिशा
जर तुमच्या राऊटरला बाहेरचे अँटेना असतील, तर एक अँटेना सरळ आणि दुसरा आडवा ठेवल्यास घरभर सिग्नल अधिक चांगल्या प्रकारे पोहोचू शकतात.

राऊटर रीस्टार्ट करा
राऊटर सतत सुरू ठेवल्यामुळे काही वेळा त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. आठवड्यातून एकदा राऊटर बंद करून पुन्हा सुरू केल्यास अनेक लहान तांत्रिक अडचणी दूर होऊ शकतात.

महागडा इंटरनेट प्लॅन घेतला म्हणजे नेहमीच जास्त स्पीड मिळेल असे नाही. राऊटरची योग्य जागा, योग्य सेटिंग्ज आणि नियमित देखभाल यामुळेही इंटरनेटचा अनुभव मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो.

Comments are closed.