कर्जमाफीच्या यादीत नाव नाही; नैराश्यातून यवतमाळच्या शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यवतमाळमधील राळेगाव तालुक्यातील भांब येथील शेतकरी राजू बापुराव चुड्डके यांनी कर्जमाफीच्या यादीत आपले नाव नसल्याच्या नैराश्यातून विष घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  राजू चुड्डके यांच्या नावावर मौजा मुधापूर उजाड येथे 1 हेक्टर 39 आर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक लाखांहून अधिक पीककर्ज, विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांचे सुमारे अडीच लाखांचे कर्ज तसेच घरकुलासाठी घेतलेले खासगी कर्ज होते. सततची नापिकी, वाढते कर्ज आणि आर्थिक विवंचनेमुळे ते आधीच मानसिक तणावाखाली होते. त्यातच राळेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या यादीत आपले नाव आले नसल्याचे समजल्यानंतर ते अधिकच खचले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विष घेतले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत राजू चुड्डके यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. दरम्यान, या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते मनीष जाधव यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर ताशेरे ओढले आहेत. शेतकरी आधीच नापिकी आणि दुष्काळाच्या संकटात असताना तांत्रिक कारणांमुळे अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा धोरणांमुळे शेतकरी नैराश्याकडे ढकलले जात असून या आत्महत्या नसून शासन व्यवस्थेच्या अपयशातून घडलेल्या हत्या आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Comments are closed.