डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला न्यायालयाचा पुन्हा दणका, जामीन देण्यास नकार

डोंबिवली बातम्या: शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जामीन मिळवण्यासाठी रमेश म्हात्रेचे प्रयत्न सुरु आहेत.  वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेला तत्काळ जमीन देण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा नकार दिला आहे. रमेश म्हात्रेला शुक्रवारपर्यंत जामीन मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय?

या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त (डीसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.  आधी डॉक्टरांना मारहाण करायची आणि मग प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागण्याच्या रमेश म्हात्रेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तुम्ही मतदारांकडे जाता आम्हाला तुमची सेवा करायची आहे, म्हणून मत मागता आणि निवडून आल्यावर मारहाण करता असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेला कानपिचक्या दिल्या आहेत. लोक तुम्हाला मते देऊन निवडून आणतात आणि निवडून आल्यावर फाईल आणि खुर्च्यांनी त्यांची डोकी फोडता, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने असं वागायचं का? असा सवाल देखील मुंबई उच्च न्यायालयाने नगरसेवक रमेश म्हात्रेला केला आहे.

या प्रकरणी शुक्रवार पर्यंत सुनावणी तहकूब

मारहाण करताना रमेश म्हात्रे अर्ध्या सेकंदाचाही वेळ दवडत नव्हते, ते सतत मारहाण करत राहिले जेणेकरून वेळ अजिबात वाया जाणार नाही अशी टिप्पणी उच्च न्यायालयानं केली आहे. रमेश म्हात्रे 73 वर्षीय वाटत नाही, तुम्ही त्यांचे मारहाणीचे व्हिडिओ बघितले का? मुंबई उच्च न्यायालयाच्या हंगामी सरन्यायाधीश रवींद्र भाऊ यांची रमेश म्हात्रेंच्या वकिलांना विचारणा केली. ते टेबलवरुन जवळ जवळ उड्यामारून डॉक्टरला मारहाण करत होते असे उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणी शुक्रवार पर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर तणाव वाढला होता. एका महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा या चौघांवर आरोप आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक केली. मारहाणीचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आधी तिघांना अटक केली. मात्र, विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रेलाही अटक करण्यात आली.

रमेश म्हात्रेवर हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल

डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणारे शिंदे गटाचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे याचा भूतकाळ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर रमेश सुकऱ्या म्हात्रे (Ramesh Mhatre) याने हल्ला केला आहे, त्याच वैद्यकीय क्षेत्राने म्हात्रेला दोनदा जीवदान दिले होते. होय, तुम्ही बरोबर ऐकताय! हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले ‘बाहुबली’ राजकारणी रमेश म्हात्रे याच्यावर 2008 मध्ये जीवघेणा गोळीबार झाला होता. त्या वेळी शर्टच्या खिशातील पेनाने गोळी अडवली, पण ती पोटात घुसली. मृत्यूशी झुंज देत असताना डोंबिवलीच्या एका खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून म्हात्रेंचे प्राण वाचवले होते. इतकंच नाही, तर त्याआधी झालेल्या एका हल्ल्यात म्हात्रेची किडनी निकामी झाली असताना, याच डॉक्टरांनी त्यांची एक किडनी काढून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर ‘बाहुबली’ म्हात्रे कृतज्ञतेपोटी थेट पाया पडायचे. मात्र, आज त्याच डॉक्टरांच्या सहकाऱ्यांवर हात उचलल्याच्या घटनेने म्हात्रे तुरुंगाच्या उंबरठ्यावर आहेत.

Comments are closed.