ईशान किशनचा धुमाकूळ! 2026 मध्ये ठोकल्या धडाकेबाज धावा; सूर्यकुमार अन् अभिषेक शर्माच्या विक्रमाशी केली बरोबरी

ईशान किशनने जेव्हापासून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे, तेव्हापासून काही सामने सोडले तर त्याने जबरदस्त शैलीतच फलंदाजी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 मालिकेतही ईशानने एक अर्धशतक ठोकले आणि उर्वरित दोन सामन्यांमध्येही छोट्या पण उपयुक्त पार्या खेळल्या. यादरम्यान ईशानने अशा क्लबमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत केवळ भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा हेच होते. त्याने या वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 800 पेक्षा जास्त धावा पूर्ण केल्या आहेत.

​बऱ्याच काळानंतर ईशान किशनला पुन्हा एकदा टीम इंडियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने याचे सोने केले. या वर्षात, म्हणजेच 2026 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ऑस्ट्रियाचा करनबीर सिंग आहे. त्याने 21 सामने खेळून 846 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ईशान किशन आहे. त्याने 23 सामने खेळून 812 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर आहे. त्याने 16 सामन्यांत 566 धावा केल्या आहेत. म्हणजेच पहिल्या दोन आणि तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजात बराच मोठा फरक आहे. या वर्षात आतापर्यंत केवळ दोनच फलंदाज 800 पेक्षा जास्त धावा करू शकले आहेत.

​करनबीर सिंगने गेल्याच वर्षी, म्हणजेच 2025 मध्ये 32 सामने खेळून 1488 धावा केल्या होत्या, जो एक विक्रम आहे. एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही खेळाडूने एवढ्या धावा केलेल्या नाहीत. एका वर्षात 800 पेक्षा जास्त धावा करणारे भारतात आतापर्यंत केवळ दोनच फलंदाज होते, आता त्यात ईशानच्या नावाचाही समावेश झाला आहे. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 1164 धावा करण्याचा विक्रम केला होता, जो आतापर्यंत इतर कोणत्याही भारतीयाला करता आलेला नाही. त्यानंतर अभिषेक शर्माने 2025 मध्ये 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 859 धावा केल्या होत्या. आता ईशाननेही 812 धावा केल्या आहेत.

​आता ईशानकडे अभिषेक शर्माला मागे टाकून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे, तसेच त्याचा फॉर्म असाच राहिला तर तो या वर्षी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रियाच्या करनबीर सिंगलाही मागे टाकू शकतो. अर्थात, यासाठी त्याला सातत्याने धावा करत राहावे लागेल. पण सध्याच्या घडीला एका कॅलेंडर वर्षात 800 पेक्षा जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे, हीच मोठी गोष्ट आहे.

​ईशानने झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत उत्तम फलंदाजी केली. त्याने पहिल्या सामन्यात 35 धावा केल्या, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात धडाकेबाज 81 धावा ठोकल्या आणि तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात 29 धावा केल्या. याच कारणामुळे टीम इंडियाने झिम्बाब्वेचा मालिकेत व्हाईटवॉश (सूपडा साफ) केला. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. यामुळे कर्णधार अय्यर तर खूप खूश दिसलाच, शिवाय या मालिकेसाठी प्रशिक्षक बनवलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनीही संघाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.

Comments are closed.