CWG 2026 – वेटलिफ्टिंगमध्ये पदकांचा चौकार, हिंदुस्थानच्या ज्ञानेश्वरीने पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत उतरत इतिहास रचला
स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये (commonwealth games 2026) हिंदुस्थानच्या वेटलिफ्टिंगपटूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. मीराबाई चानू (सुवर्ण), ऋषिकान्त सिंग (रौप्य) आणि राजा मुथुपंडी (रौप्य) यांच्यापाठोपाठ आता ज्ञानेश्वरी यादवने महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. या पदकासह हिंदुस्थानने वेटलिफ्टिंगमध्ये पदकांचा चौकार लगावला आहे. चुरशीच्या ठरलेल्या या फायनलमध्ये ज्ञानेश्वरीने स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 111 किलो अशी एकूण 199 किलो वजनाची नोंद करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेत नायजेरियाच्या ओनोमे ओमोलोला डिडिह हिने एकूण 206 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर कॅनेडियन वेटलिफ्टिंगपटू रेबेका ग्रुक्सने (178 किलो) कांस्य पदक आपल्या नावावर केले. स्पर्धेच्या सुरुवातीला स्नॅच प्रकारात ज्ञानेश्वरीने अत्यंत आत्मविश्वासाने पहिल्या प्रयत्नात 82 किलो, दुसऱ्या प्रयत्नात 85 किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात 88 किलो वजन यशस्वीपणे उचलले. स्नॅच फेरी संपल्यानंतर नायजेरियाच्या डिडिह हिने 93 किलो वजन उचलत आघाडी घेतली होती, ज्यामुळे ज्ञानेश्वरीला काहीशी पिछाडी पत्करावी लागली. मात्र, क्लीन अँड जर्क विभागात पुनरागमन करताना ज्ञानेश्वरीने पहिल्याच प्रयत्नात 103 किलो वजन उचलत थेट गुणतक्त्यात पहिले स्थान गाठले. त्यानंतर डिडिहने 105 किलो वजन उचलून पुन्हा आघाडी घेतली. ज्ञानेश्वरीने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 107 किलो वजन उचलले, तर नायजेरियन खेळाडूने 1100 किलो वजन उचलून सुवर्णपदक निश्चित केले. अखेरच्या प्रयत्नात ज्ञानेश्वरीने 11 किलो वजन यशस्वीपणे उचलून दिमाखात आपले रौप्य पदक निश्चित केले.
छत्तीसगढ़मधील राजनांदगाव येथील रहिवासी असलेली 23 वर्षीय ज्ञानेश्वरी यादव ही हिंदुस्थानच्या अत्यंत होतकरू आणि तंत्रशुद्ध वेटलिफ्टिंगपटूंपैकी एक मानली जाते. तिने यापूर्वी 2022 च्या आयडब्ल्यूएफ (IWF) ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत 49 किलो वजनी गटात तीन रौप्य पदके जिंकून इतिहास रचला होता. तसेच, राष्ट्रीय स्तरावर अनेक ज्युनिअर विक्रम तिच्या नावावर आहेत. 2026 मध्ये तिने आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत 194 किलोच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य व कांस्य पदक जिंकले होते. या सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावरच तिची 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या संघात निवड झाली होती.
Comments are closed.