VIDEO: खिलाडूवृत्ती की चूक? रन-आऊट नाकारला आणि सामनाही गमावला!
लंका प्रीमियर लीग (LPL) 2026 च्या हंगामातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये वानिंदू हसरंगाच्या कृतीचे कौतुक होत आहे, मात्र त्याचा संघ मोठ्या फरकाने पराभूत झाला आहे. रविवारी (26 जुलै) LPL 2026 मध्ये 13 वा सामना कॅंडी रॉयल्स विरुद्ध जाफना किंग्ज असा खेळला गेला, ज्यामध्ये कॅंडी रॉयल्सचा खेळाडू वानिंदू हसरंगाने जाफना किंग्जचा फलंदाज अविष्का फर्नांडोला धावबाद करण्याचा प्रयत्न करूनही जीवदान दिले. पुढे हसरंगाचा हाच निर्णय संघासाठी महागाचा ठरला.
या सामन्यात हसरंगा सातवे षटक टाकण्यास आला. कामिल मिशाराने त्याच्या चेंडूवर एक जोरात शॉट खेळला आणि तो चेंडू नॉन-स्ट्रायकर एंडचा फलंदाज फर्नांडोला लागला. चेंडू फर्नांडोला लागून हसरंगाच्या हातात पडला आणि त्याने लगेच फलंदाजाला धावबाद केले. अविष्का क्रीजच्या बाहेर असल्याने पंचांनी त्याला बादही दिले. हेच अपील हसरंगाने खिलाडूवृत्ती दाखवत मागे घेतले आणि पुढे जे झाले त्याचा कोणी विचारही केला नव्हता.
अविष्काला जीवदान मिळाले तेव्हा तो 46 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने 36 चेंडूंमध्ये 66 धावा केल्या. त्याचबरोबर कामिलसोबत 129 धावांची भागीदारीही केली. कामिलने 78 धावा केल्या. दोघांच्या शतकी भागीदारीमुळे जाफना किंग्जने 20 षटकांत 4 विकेट्स गमावत 199 धावसंख्या उभारली.
…आणि कॅंडी हरला
कॅंडी रॉयल्सची 200 धावसंख्येचा पाठलाग करताना सुरूवात अडखळत झाली. त्यांचे केवळ दोनच खेळाडू दुहेरी धावसंख्या करू शकले. लाहिरु उडाराने 54 आणि शाहिन आफ्रिदीने 22 धावा केल्या. कॅंडीने 18.2 षटकांतच सर्व विकेट्स गमावत केवळ 106 धावसंख्या केली. त्यामुळे जाफना किंग्जने हा सामना तब्बल 93 धावांनी जिंकला.
हा कॅंडीचा सहा सामन्यांमधील चौथा पराभव ठरला, ज्यामुळे ते गुणतालिकेत सर्वात शेवटी म्हणजे पाचव्या स्थानी आले आहेत. तसेच जाफना किंग्ज सहा पैकी तीन विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. (LPL 2026: Kandy Royals vs Jaffna Kings Wanindu Hasaranga withdraw runout appeal against Avishka Fernando)
Comments are closed.