फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चा

परभणी : शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस, देशभरातून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विविध राजकीय पक्षाचे नेते, खासदा, आमदारही त्यांना सोशल मीडियातून, फोन करुन आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे, मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मात्र, यंदाचा उद्धव ठाकरेंना वाढदिवसा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कारण, गेल्याच महिन्यात ठाकरेंच्या 6 खासदारांनी त्यांनी साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यापैकी, दोन खासदारांनी आज वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या. मात्र, परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांनी वाढदिवसाची पोस्ट डिलिट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर सकाळी दिलेल्या शुभेच्छांची पोस्ट दुपारनंतर डिलीट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आज सकाळी त्यांनी फेसबुकवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर, तसेच या पोस्टवर अनेकांच्या टीकात्मक कमेंट आल्यानंतर ती पोस्ट अचानक डिलीट करण्यात आली. त्यामुळे पोस्ट डिलीट करण्यामागचे नेमके कारण काय? अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी खासदार संजय जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पोस्ट डिलीट करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सकाळी केलेली शुभेच्छांची पोस्ट आणि त्यानंतर ती हटविल्याने परभणीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दुपारनंतर फेसबुक पोस्ट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्याने तेही चर्चेत आहेत.

खासदार ओमराजेंनी दिल्या शुभेच्छा

उद्धव ठाकरेंसह आज शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही वाढदिवस आहे. त्यामुळे, फुटलेल्या खासदारांकडून त्यांनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही रामदास कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर, नेटीझन्सने कमेंट करुन त्यांना उद्धव ठाकरेंसाठी पोस्ट का केली नाही, असा सवाल केला. त्यानंतर, ओमराजेंकडून उद्धव ठाकरेंनाही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी त्यांनी केवळ ट्विटरवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या या खासदारांच्या शुभेच्छांमुळे उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आणखी चर्चेत आला.

हेही वाचा

20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई

Comments are closed.