Dapoli News – बुरोंडी रोडवरील महावितरणचा उघडा फ्युज बॉक्स ठरतोय धोकादायक; तातडीने दुरुस्तीची मागणी
दापोली शहरालगत असलेल्या बुरोंडी रोडवरील चंद्रनगर परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या वीज वितरण डीपीचा (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) फ्युज बॉक्स पूर्णपणे उघडा पडला असून त्याचे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता दापोली शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. एवढेच नव्हे तर परिसरातील गुरे, म्हशी व इतर पाळीव जनावरेही याच रस्त्याने ये-जा करीत असतात. अशा परिस्थितीत उघडा पडलेला फ्युज बॉक्स हा नागरिकांसह मुक्या प्राण्यांसाठीही धोकादायक ठरत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने परिसरात ओलावा वाढला आहे. अशा वेळी उघड्या विद्युत यंत्रणेमुळे वीजप्रवाह बाहेर येण्याचा किंवा शॉर्टसर्किट होण्याचा धोका अधिक वाढतो. एखादे लहान मूल, निष्पाप नागरिक किंवा जनावर चुकून या फ्युज बॉक्सच्या संपर्कात आल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित फ्युज बॉक्सचे झाकण बराच काळ तुटलेल्या अवस्थेत असून याबाबत वारंवार सूचना करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत. महावितरणने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून फ्युज बॉक्सला नवीन व मजबूत झाकण बसवावे, आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच धोकादायक विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दापोली शहरात सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा देण्याबरोबरच नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच या गंभीर समस्येची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Comments are closed.