पोलिसांकडून होणारी बेदम मारहाण ही चिंतेची बाब आहे.

विद्यार्थी आंदोलकांवरील लाठीचार्जवर सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

देशभरात आणि विशेषत: दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या अत्याचारांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत टिप्पणी केली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाला तीव्र शब्दांत फटकारले आहे. शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार ही एक घटनात्मक हमी आहे. केवळ आंदोलन होत आहे या कारणावरून आंदोलकांवरील पोलिसांच्या कथित अत्याचारांचे समर्थन करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच आंदोलनादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले तितकेच चिंताजनक असल्याचे निरीक्षण नोंदवत सरकारला यावर उत्तर देण्यास सांगितले आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सोमवारी विद्यार्थ्यांना आंदोलनावेळी झालेल्या मारहाणीशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी केली. याप्रसंगी आंदोलन हा घटनात्मक अधिकार आहे; त्यासाठी नियम निश्चित केले पाहिजेत, असे न्यायालयाने स्पष्ट पेले. शांततापूर्ण आंदोलनांना चालना देण्यासाठी आणि समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना सक्षम करण्याकरिता देशभरात एकसमान नियमावलीची आवश्यकता असल्याचे मतप्रदर्शनही करण्यात आले. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा जनतेचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही. केवळ निषेध किंवा आंदोलन आहे म्हणून पोलिसांची क्रूरता किंवा कठोर कारवाईचे समर्थन करता येणार नाही, असेही कठोर बोलही न्यायमूर्तींनी सुनावले.

20 जुलै रोजी जंतरमंतर येथे झालेल्या पोलीस लाठीचार्जशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हे विधान केले. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. न्यायालय आता मंगळवारी यासंबंधी सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी घेणार आहे. नीट पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या क्रूरतेचा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. या याचिका 20 जुलै रोजी झालेल्या कॉक्रोच जनता पक्षाच्या (सीजेपी) संसद मोर्चाशी संबंधित आहेत.

संसद मोर्चादरम्यान लाठीचार्ज झाल्याने 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कॉक्रोच जनता पक्षाने 20 जुलै रोजी जंतर मंतर ते संसद असा मोर्चा काढला होता. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनात आंदोलक आणि पोलीस यांच्यात अनेकदा चकमकी झाल्या. काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून संसदेच्या दिशेने मोर्चा काढला. ते जंतरमंतरवरून संसद मार्ग, जनपथ चौक, युद्धस्मारक, कर्तव्यपथ आणि विजय चौक मार्गे संसदेजवळ पोहोचले. त्यांनी संसद भवन परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या होत्या.

Comments are closed.