भारतीय क्रिकेटला हादरवणारी एक्झिट! गौतम गंभीरचा सर्वात विश्वासू साथीदाराने अचानक दिला राजीनामा
रायन टेन डोशेटने भारताचे सहाय्यक प्रशिक्षक पद सोडले: भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट (Ryan ten Doeschate) यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सपोर्ट स्टाफमधील या मोठ्या बदलामुळे क्रिकेट वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. यूके दौऱ्यातील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, आगामी आयपीएल 2027 मध्ये ते पुन्हा एकदा कोलकाता नाइट रायडर्स (KKR) सोबत काम करताना दिसणार आहेत.
राजीनाम्याचे मुख्य कारण आणि यूके दौरा
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, रायन टेन डोशेट यांनी यूके दौऱ्यादरम्यानच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आपल्या या निर्णयाची कल्पना दिली होती. या दौऱ्यात भारतीय संघाला टी-20 आणि एकदिवसीय (ODI) अशा दोन्ही मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच ते पद सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कुटुंबाला अधिक वेळ देता यावा, हेदेखील या निर्णयामागील एक प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.
टेन डोशेट यांचा टीम इंडियातील कार्यकाळ
गौतम गंभीर यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर नेदरलँड्सचे माजी कर्णधार रायन टेन डोशेट यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने काही महत्त्वाची यश शिखरे गाठली, तर काही मोठ्या पराभवांचाही सामना केला. 2025 चा आशिया चषक आणि 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. तर ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पराभव, तसेच मायदेशात न्यूझीलंड (0-3) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (0-2) कसोटी मालिकांमध्ये टीम इंडियाचा धुव्वा उडवला.
केकेआर (KKR) सोबत जुने नाते
रायन टेन डोशेट यांचे कोलकाता नाइट रायडर्सशी जुने आणि जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. 2012 आणि 2014 मध्ये केकेआरने आयपीएल विजेतेपद मिळवले, तेव्हा ते संघाचे महत्त्वाचे खेळाडू होते. 2022 मध्ये त्यांनी केकेआरच्या क्षेत्ररक्षण (फिल्डिंग) प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आणि 2024 पर्यंत ते या कोचिंग स्टाफचा भाग होते. भारतीय संघाची साथ सोडल्यानंतर आता ते 2027 च्या आयपीएल हंगामात पुन्हा एकदा केकेआरच्या ताफ्यात प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हे ही वाचा –
Comments are closed.