जसप्रीत बुमराहने एक वर्षासाठी पूर्ण विश्रांती घेऊन तंदुरुस्तीसाठी ब्रेक घ्यावा! माजी क्रिकेटपटूने दिला सल्ला
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या वाढत्या वर्कलोड आणि दुखापतींच्या समस्येवर हिंदुस्थानच्या माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. आयपीएल 2026 पासून बुमराह फक्त दोनच सामने खेळला असून, इंग्लंडविरुद्धची अंतिम एकदिवसीय मालिका चुकवल्यानंतर तो आता श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर झाला आहे. या पार्श्वभूमीवर, बुमराहने किमान सहा महिने ते एक वर्षासाठी क्रिकेटपासून पूर्ण विश्रांती घेऊन आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला घावरी यांनी दिला आहे. तसेच मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना राष्ट्रीय संघात परत आणले पाहिजे, असे हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांचे मत आहे.
एका वृत्तपत्राशी बोलताना 75 वर्षीय घावरी म्हणाले की, बुमराह अनफिट असताना खेळल्यामुळे त्याची शारीरिक स्थिती आणखी बिकट होत आहे. जर तो संपूर्ण मालिकेदरम्यान आपल्या कामाचे योग्य व्यवस्थापन करू शकत असेल, तरच त्याचा संघात समावेश केला पाहिजे. वारंवार दुखापतींमुळे बुमराह गेल्या दोन-तीन वर्षांत कधी संघात असतो तर कधी बाहेर असतो आणि तो क्वचितच एखादी संपूर्ण मालिका खेळला आहे, ही देशासाठी व त्याच्यासाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. याचबरोबर, घावरी यांनी आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना हिंदुस्थानी संघात पुन्हा स्थान देण्याची जोरदार मागणी केली आहे. भुवनेश्वर कुमारच्या अनुभवाचा टीम इंडियाला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आजही फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. तसेच, कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना आलटून पालटून संधी दिल्यास बुमराहवरील अतिरिक्त ताण आणि दबाव नक्कीच कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, बुमराह सर्व फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळू शकणार नाही, त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला केवळ महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्येच खेळवण्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा सल्लाही घावरी यांनी दिला आहे
Comments are closed.