गॅस स्टोव्हची सुरक्षा : गॅसजवळ 'ही' चूक कधीही करू नका

स्वयंपाकघरात गॅस हा रोजच्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सकाळचा चहा असो, नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण, दिवसातून अनेक वेळा गॅसचा वापर होतो. त्यामुळे गॅसजवळच्या छोट्या गोष्टींकडे आपलं लक्षही जात नाही. पण याच छोट्या निष्काळजीपणामुळे कधी कधी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. जाणून घेऊयात अशा कोणत्या चुका आहेत ज्या टाळणं गरजेचं आहे.

गॅसजवळ कोणत्या चुका करू नयेत?

गॅसजवळ कापड ठेवणे
किचनमध्ये कापड, टॉवेल किंवा पेपर टॉवेल सहज हाताशी ठेवण्याची सवय असते. मात्र हे साहित्य ज्वालेच्या अगदी जवळ ठेवल्यास आग लागण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा वस्तू गॅसपासून सुरक्षित अंतरावर ठेवा.

प्लास्टिकच्या वस्तू
प्लास्टिकच्या पिशव्या, डबे किंवा इतर वस्तू गॅसजवळ ठेवणे टाळा. उष्णतेमुळे त्या वितळू शकतात किंवा. आग लागण्याचा धोका निर्मण होऊ शकतो.

किचन सोडू नका
गॅसवर तेल तापत असताना किंवा एखादा पदार्थ शिजत असताना किचनमधून बाहेर जाणं धोकादायक ठरू शकतं. काही मिनिटांसाठी जरी लक्ष दुसरीकडे गेलं तरी पदार्थ जळणे किंवा तेलाला आग लागणे यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकतो.

गॅस बंद केलाय?
स्वयंपाक झाल्यानंतर फक्त नॉब बंद करून थांबू नका. गॅसची ज्योत पूर्णपणे विझली आहे आणि स्टोव्हचे नॉब बंद आहेत याची खात्री करा. LPG सिलिंडर वापरत असल्यास घरातून बाहेर पडताना आवश्यक ती सुरक्षा तपासणी करा.

गॅसची नळी
गॅसची नळी जुनी, खराब झालेली किंवा तडे गेलेली दिसत असल्यास ती दुर्लक्षित करू नका. अधिकृत तंत्रज्ञाकडून तिची तपासणी करून घ्या. स्वतःहून गॅसच्या जोडणीत बदल करण्याचा प्रयत्न करू नका.

गॅसचा वास आल्यास…
गॅसचा वास जाणवला तर माचिस, लायटर किंवा कोणतेही इलेक्ट्रिकल स्विच वापरू नका. शक्य असल्यास सुरक्षित पद्धतीने गॅसचा पुरवठा बंद करा आणि परिसर हवेशीर करा. परिस्थिती गंभीर वाटल्यास घराबाहेर पडून संबंधित गॅस सेवा किंवा आपत्कालीन मदत घ्या.

गॅस ही रोजच्या जीवनातील गरजेची गोष्ट असली, तरी तिचा वापर करताना थोडीशी सावधगिरी खूप मोठा धोका टाळू शकते. स्वयंपाकघरात घाईपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची. कारण गॅसजवळ केलेली छोटी चूक काही वेळा मोठी किंमत मोजायला लावू शकते.

Comments are closed.