मंत्री, महापौर, खंडीभर नगरसेवक, लाखभर कार्यकर्ते असूनही भाजपच्या तिरंगा यात्रेसाठी दहावीचे विद्यार्थी वेठीला! पावसापाण्यात दुपारी 12 वाजेपासूीन विद्यार्थ्यांची पायपीट
मंत्री, महापौर, खंडीभर नगरसेवक, लाखभर कार्यकर्ते असूनही भाजपच्या तिरंगा यात्रेसाठी दहावीचे विद्यार्थी बोलावण्यात आले आहेत. शहरातील प्रत्येक शाळेला दहावीच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ वाजेपासूनच पायपीट करण्यासाठी पाठवण्याचे तुघलकी फर्मान भाजपच्या वतीने सोडण्यात आले आहे. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर ‘जेन झी’ सोबत असल्याचे दाखवण्याच्या नादात विद्यार्थ्यांना मात्र वेठीला धरण्यात येत आहे.
‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्यासह संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेत बदलाच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर देशभरातील तरुणांनी ऐतिहासिक आंदोलन केले. या आंदोलनाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपने एवढा धसका घेतला आहे, की त्यांना जळी, स्थळी ‘जेन झी’च दिसत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी तर तरुणांशी संवाद करण्याचा सपाटा लावला असून भाजपनेही दूर गेलेल्या ‘जेन झीना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
कार्यकर्ते गायब, विद्यार्थ्यांच्या हाती झेंडा
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन लाठीहल्ला, पेलेटगनचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे भाजपच्या विरोधात तरुणाईमध्ये भयंकर संताप आहे. त्यामुळे तिरंगा यात्रेला अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही, या भयगंडाने ग्रासलेल्या भाजपने शहरातील शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठवण्याचे फर्मान सोडले आहे. तिरंगा यात्रा दुपारी २ वाजता निघणार असली तरी विद्यार्थ्यांना दुपारी १२ वाजताच बोलावण्यात आले आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोबाईल नंबरसह यादी शाळांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केली आहे.
दहावीच्या पोरांना वेठीस धरणारा हा आहे ‘जगातील सर्वात मोठा पक्ष’! छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर उधारीचे दंड फुगवायला इयत्ता दहावीचे मुलं उद्या कार्यक्रमासाठी दुपारी १२ पासून क्रांती चौकात आणून बसवले जाणार आहेत.. ही फक्त एकाच शाळेची यादी.. अगदी मोबाईल नंबर सहित.… pic.twitter.com/N5IaJEUg9N
— अंबादास दानवे (@iambadasdanve) १३ ऑगस्ट २०२६
जगातील सर्वात मोठा पक्ष असूनही…
अतुल सावे हे फडणवीस सरकारमधील वजनदार मंत्री आहेत. महापौर समीर राजूरकर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. महापालिकेत भाजपचे ५८ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती भाजपच्याच ताब्यात आहे. हाकेच्या अंतरावर अनुराधा चव्हाण, प्रशांत बंब हे आमदार आहेत. तरीही ‘जगातील सर्वात मोठा पक्ष’ अशी शेखी मिरवणाऱ्या भाजपवर गर्दी जमवण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची केविलवाणी वेळ आली आहे.
Comments are closed.