सुखबीरसिंह बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या जसपालसिंह याला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा अकाली दलाचे प्रमुख सुखबिरसिंह बादल यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जसपालसिंह याला मुदखेड न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुगट जवळील माता साहिब गुरुव्दारा येथे दर्शन करुन परत येत असलेल्या पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंह बादल यांच्यावर सेवादार जसपालसिंह याने कृपाणने हल्ला केला, मात्र त्यांच्या सुरक्षेत असलेला अधिकारी व कर्मचार्‍यांनी लगेच हस्तक्षेप करुन त्यांना वाचवले. त्यानंतर लगेच आरोपी जसपालसिंग याला ताब्यात घेतले. त्यानंतर सुखबीरसिंह यांना नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी त्यांना आज डिस्चार्ज दिला. आरोपी जसपालसिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. नांदेड पोलीस आणि एटीएसचे पथक त्याची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जसपालसिंग हा मुळचा पुण्यातील सोलापूर बाजार परिसरात राहणारा आहे. त्याचे संपूर्ण आयुष्य पुण्यातच गेले आहे. त्याची पत्नी कॅम्प परिसरातील एका शाळेत शिक्षिका असून, ती आपल्या नातेवाईकांसोबत अन्य भागात राहते. बी.कॉम.चे शिक्षण घेतल्यानंतर त्याने कायद्याची पदवी घेऊन वकीली करायला सुरुवात केली. त्याचे याच भागात स्नॅक्सचे दुकान देखील आहे. मुंबईत काही दिवस एका कार्पोरेट कंपनीत त्याने नोकरीही केली होती. २०२३ मध्ये तो निवृत्त झाल्यानंतर पुण्यातील सर्व व्यवसायिक सोडून धार्मिक सेवा करण्यासाठी मुगट येथील माता साहिब देवनजी या गुरुव्दारात सेवादार म्हणून गेली दोन वर्ष काम करत होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पंजाबमध्ये ड्रग्जची समस्या मोठी असल्याने आपण अस्वस्थ असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी हा हल्ला पूर्वनियोजित होता किंवा त्यामागे नेमका कुणाचा हात आहे याची सखोल चौकशी सुरु आहे. एटीएस आणि नांदेड पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

दरम्यान एटीएसच्या पथकाने आज त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी झाडाझडती सुरु केली आहे. त्यांच्या कुटुंबियांची देखील चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आज त्याला न्यायालयात दाखल केले असता पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास करावयाचा असल्याचे सांगून पोलीस कोठडी मागितले. मुदखेड न्यायालयाने जसपालसिंह याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Comments are closed.