सडलेल्या भाज्या, उंदराच्या लेंडय़ा, मुदतबाह्य उत्पादने; झेप्टो, ब्लिंकीट, इन्स्टामार्ट, रजिदी रिटेलला एफडीएचा दणका
अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) राज्यभरात धडक कारवाई सुरू असून ऑनलाईन पुरवठा करणाऱ्या झेप्टो, ब्लिंकीट, इन्स्टामार्ट, भगवती स्टोअरला एफडीएने दणका दिला. या कंपन्यांच्या मुंबईसह राज्यभरातील 86 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. अस्वच्छता व अन्य कारणास्तव त्यातील एका आस्थापनेला टाळे ठोकले गेले असून 60 जणांना ठराविक मुदतीत सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे तर 14 आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे अन्नपदार्थांची विक्री
गुरुवारी एफडीएने विशेष तपासणी मोहीम राबवली. मुंबईत घाटकोपरच्या पटेल चौकातील ब्लिंकीटच्या गोदामाची तपासणी करण्यात आली तेव्हा तिथे अन्नपदार्थ साठवून ठेवण्याच्या रॅकवर अस्वच्छता आढळली. सडलेल्या भाज्या दिसून आल्या. ठिकठिकाणी झुरळ फिरत होती, असे दिसून आले. कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी अहवाल व पिण्याच्या पाण्याचा तपासणी अहवाल उपलब्ध नसल्याचे आढळून आले.
मुदत संपलेले अन्नपदार्थ विक्रीला
वांद्रे पूर्व, हिल रोड येथील रजिदी रिटेल प्रायव्हेट लिमिटेडमध्येही अस्वच्छता उदंड असल्याचे एफडीएला आढळले. अन्न पदार्थांजवळ धूळ आणि उंदराच्या लेंडय़ा पडल्या होत्या. रजिदी रिटेलच्या अंधेरी पश्चिम येथील दुकानातही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. तिथे झोराबियन चिकट करी कट हे उत्पादन मुदतबाह्य झाले असतानाही विक्रीला ठेवले गेले होते.
घातक रसायनांच्या बाजूलाच अन्नपदार्थांची साठवण
अंधेरीच्या लोखंडवाला येथील उच्चभ्रू वस्तीमधील झेप्टोच्या स्टोअरमध्ये अन्नपदार्थ आणि रसायनयुक्त पदार्थ एकत्र ठेवल्याचे दिसून आले. फ्रीजचे तापमान व्यवस्थित नव्हते. अन्न पदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात ग्लोव्हज नव्हते. अन्न सुरक्षेचे सर्व नियम या स्टोअरमध्ये धाब्यावर बसवले गेल्याचे निदर्शनास आले.
गोदामांमध्ये कमालीची अस्वच्छता
झेप्टोच्या मुलुंड, गोरेगाव, ब्लिंकीटच्या मालाड मालवणी आणि घाटकोपर तसेच रजिदी रिटेलच्या अंधेरी महाकाली येथील गोदामांमध्येही एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तिथे कमालीची अस्वच्छता आढळून आली. अन्नपदार्थ रॅकऐवजी जमिनीवरच साठवून ठेवण्यात आल्याचे पाहून एफडीएच्या अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.
Comments are closed.