भाजप आणि काँग्रेसमध्ये 'अलिंगन युद्ध' प्रतिक्रिया पाठवा
तापविला विदेशी नेत्यांची गळाभेट घेतल्याचा मुद्दा
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात एक अनोखे राजकीय ‘युद्ध’ सध्या पहावयास मिळत आहे. विदेशी राष्ट्रप्रमुखांना आलिंगन देऊन त्यांची गळाभेट घेणे, हा राजकीय ‘युद्धा’चा विषय असल्याचे दिसून येते. याचा प्रारंभ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तर भारतीय जनता पक्षानेही त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे.
तीन दिवसांपूर्वी दिल्लीत राहुल गांधी यांनी ‘रचनात्मक काँगेस’ या मथळ्याखाली एका कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका केली. विदेशी राष्ट्रप्रमुखांना आलिंगन देणे, हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण आहे, असा टोमणा त्यांनी मारला. त्यांनी याच कार्यक्रमात काँग्रेस नेते संदीप दिक्षित यांना प्रतिकात्मक मिठी मारली. त्यावेळी ‘आपण मेलोनी समजून तर मला मिठी मारली नाही ना, असा प्रश्न विचारुन संदीप दिक्षीत यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या नेत्या जॉर्जिया मिलोनी यांच्या मैत्रीवर तिरकस टिप्पणी केली. भारतीय जनता पक्षानेही आता काँग्रेसच्या या प्रकारावर जशास तसे प्रत्युत्तर देऊन बाजू उलटविण्याचा प्रयत्न केला आहे.
इंदिरा गांधी यांची छायाचित्रे
भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्या व्यंगात्मक आरोपांना प्रत्युत्तर म्हणून दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रात इंदिरा गांधी दिवंगत पॅलेस्टाईन नेते यास्सीर अराफत यांना आलिंगन देतांना दिसत आहेत. तसेच क्युबाचे दिवंगत नेते फिडेल कॅस्ट्रो यांचीही त्या गळाभेट घेताना अन्य छायाचित्रात दिसत आहेत. राहुल गांधी या छायाचित्रांना काय म्हणतील, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ‘हे चोकिंन सेन्सेशन आहे, पोटातील भूक आहे की शारिरीक भूक आहे, यावर राहुल गांधी यांनी प्रकाश टाकावा, असे टोमणायुक्त आव्हान त्यांनी गांधी यांना दिले आहे.
भारतीय जनता पक्षाकडून टीका
दोन राष्ट्रप्रमुख एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांनी गळाभेट घेणे यात काहीही आर्श्चकारक, आक्षेपार्ह किंवा अयोग्य नसते. अनेक राष्ट्रनेते अशा प्रकारे एकमेकांची भेट जाहीररित्या घेत असतात. त्यातून अभद्र अर्थ काढणे, हे सर्वथैव अयोग्य आणि असभ्यपणाचे आहे. तथापि, निराशेने घेरलेले विरोधी पक्षनेते आता या पातळीवर उतरत असून स्वत:चेच हसे करुन घेत आहेत, असा जोरदार टीकाप्रहार भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे नेते अमित मालवीय यांनी केला आहे. एकंदर, दोन्ही पक्षांमध्ये गळाभेटीवरुन संघर्ष असल्याचे दिसत आहे.
Comments are closed.