एकाच फ्लाईट नंबरची दोन विमाने हवेत आमनेसामने; ट्रॅफिक कंट्रोलरच्या प्रसंगावधनाने शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
अमेरिकेतील फिनिक्स विमानतळावर भीषण विमान अपघात टळला आहे. एकाच फ्लाईट नंबरची दोन विमाने हवेत आमनेसामने आल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, एअर ट्रॅफिक कंट्रोलरने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अपघात टळला आणि शेकडो प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचले.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन एअरलाइन्सचे एक फ्लाइट क्रमांक 2482 हे विमान शिकागोहून येत होते, तर दुसरे फ्लाइट क्रमांक 2482 फिनिक्सवरून उड्डाण करत होते. अमेरिकन एअरलाईन्सचे फ्लाईट नंबर 2482 हे विमान साधारणपणे शिकागो ते फिनिक्स दरम्यान धावते. शिकागो-ते-फिनिक्स फ्लाइटला खराब हवामानामुळे उशीर झाला. एअरलाईन्सने वेळापत्रक पाळण्यासाठी फिनिक्सवरून दुसऱ्या विमानाचा वापर करून परतीचा प्रवास वेळेवर सुरू केला. मात्र, एअरलाईन्सच्या डिस्पॅच सेंटरच्या चुकीमुळे दोन्ही विमानांना एकच फ्लाईट नंबर देण्यात आला. परिणामी, एक विमान उतरत असताना आणि दुसरे उड्डाण करत असताना, दोन्ही विमाने एकाच नंबरसह एकाच वेळी हवेत समोरासमोर आली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ड्युटीवर असलेल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने समयसूचकता दाखवली. नियंत्रकाने दोन विमानांना अमेरिकन 2482 ऑन द अरायव्हल आणि अमेरिकन 2482 ऑन द डिपार्चर असे कॉल करण्यास सुरुवात केली. येणाऱ्या विमानाला वरच्या उंचीवर ठेवले आणि उड्डाण करणाऱ्या विमानाला एका ठराविक उंचीच्या खालीच राहण्याचे आदेश दिले. जेणेकरून दोन्ही पायलट काही अंतरावर असताना एकमेकांना पाहू शकतील.
या अचूक नियोजनामुळे दोन्ही विमाने एकमेकांच्या जवळून अत्यंत सुरक्षितपणे पुढे निघून गेली. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि अमेरिकन एअरलाईन्स या दोन्ही संस्था या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही आणि दोन्ही विमाने सुरक्षितपणे लँड झाली.
Comments are closed.