रस्त्यांवर खड्डे… वीज नाही… पाण्याची बोंब आणि नियमांचा जाच; सरकारमुळे उद्योग चालवणे कठीण बेरोजगारांनी नोकरीसाठी जायचे कुठे? चाकणमधील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे यांचा हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रस्त्यांवरील खड्डे, पाणी, विजेच्या समस्या आणि नियमांच्या जाचामुळे सरकारने राज्यात उद्योग चालवणेच कठीण करून ठेवले आहे. त्यामुळेच चाकणचे 20 उद्योग सोडून जाण्याच्या स्थितीत आहेत. हे सरकारचेच अपयश आहे, असा जोरदार हल्ला आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुण्यात केला. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांत जात असतील तर बेरोजगारांनी नोकरीसाठी जायचे कुठे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला चांगलेच फटकारले. सरकारच्या धोरणाविरोधात मोठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील चाकणच्या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील रोजगारावर मोठा परिणाम झाला असून उद्योग इतर राज्यात जात आहेत. चाकणमधील उद्योग बाहेर गेल्याने पाच हजार जणांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळणार आहे. एमआयडीसी परिसरात कचऱयाचे साम्राज्य पसरले असून वीजपुरवठय़ाचा प्रश्नही गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. नाशिकमध्येही हीच अवस्था असून प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या वेळी आदित्य ठाकरे यांनी एमआयडीसी, वासोली फाटा, ह्युंदाई चौक, खालुंब्रे रोड, कोरेगाव फाटा, आंबेठाण गाव, वाघाजाई नगर, खराबवाडी येथील रस्त्यांची पाहणी करून दुरवस्था त्यांनी निदर्शनास आणली. या वेळी आमदार सुनील शिंदे, बाबाजी काळे, जिल्हाप्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषदेतील गटनेते विजय शिंदेपाटील, विनया मुंगसे, तनुजा घनवट, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते आदी उपस्थित होते.

मुंढेंसारख्या खमक्या अधिकाऱ्याची गरज

एमआयडीसी आणि पीएमआरडीए यांमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. प्रत्येक कामाचा दर ठरलेला आहे, असा गंभीर आरोपही आदित्य ठाकरे यांनी या वेळी केला. चाकण एमआयडीसी भागातील प्रश्न सोडवण्यासाठी तुकाराम मुंढेंसारख्या खमक्या अधिकाऱयाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

उद्योग मंत्र्यांच्या सोबतचे लोक ‘टोलनाके’!

उद्या होणाऱया उद्योग मंत्र्यांच्या दौऱयाबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला. उद्या रविवार असल्याने त्यांनी येऊ नये. जर नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर प्रोटोकॉल आणि सुरक्षा बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांसारखे यावे. उद्योग मंत्र्यांभोवती फिरणारे लोक हे ‘टोलनाके’ म्हणून काम करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Comments are closed.