अपघात थांबता थांबेनात! अंधेरीत बेस्ट बसची सहा वाहनांना धडक; तीन जखमी
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील कंत्राटी बसच्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी दुपारी अंधेरी पश्चिमेकडील बेस्टच्या ए-221 बसने चार रिक्षा आणि एका कारसह एकूण सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह तिघे जखमी झाले. गोखले ब्रिज सिग्नलजवळ हा अपघात झाला. कंत्राटी चालकांच्या निष्काळजीपणामुळे बसगाडय़ांना अपघात होत असतानाही प्रशासनाने कंत्राटदारांविरोधात कठोर कारवाईचे पाऊल उचलले नाही.
ओशिवरा आगारातील पीएमआय कंपनीची वातानुकूलित अंधेरी बसस्थानक (पश्चिम) ते वर्सोवा बसस्थानक यादरम्यान प्रवासी सेवेत धावत होती. सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बस गोखले ब्रिजजवळ आली असता बसचालकाने हॅण्डब्रेक सोडला. त्याचक्षणी बसवरील नियंत्रण सुटल्याने ती पुढे जाऊन चार रिक्षा, एका एर्टिगा कार आणि एका ऑक्टिव्हा स्कूटरला जोराने धडकली.
या अपघातात रिक्षाचालक, पादचारी आणि ऑक्टिव्हा स्कूटरचालक जखमी झाला. या तिघांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद डीएननगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी ‘कुमकुम चौकी’ येथे बस उभी केली होती. बेस्ट प्रशासन आणि पोलिसांमार्फत अपघातप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
जखमींची नावे
युनूस शेख (55, रिक्षाचालक), मनोजकुमार बलदेव (30, पादचारी) आणि अंनिस धारी (20, ऑक्टिव्हा चालक). तिन्ही जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
चालक, कंत्राटदारावर कठोर कारवाई का नाही?
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या ताफ्यातील कंत्राटी बसगाडय़ांना वारंवार अपघात होत आहेत. अनेक अपघातांत पादचाऱ्यांचे हकनाक बळी गेले आहेत. अपघातांची ही मालिका सुरू असताना बेस्ट प्रशासन कंत्राटदार कंपनी आणि निष्काळजी कंत्राटी चालकांवर कठोर कारवाई का करीत नाही, असा सवाल मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.
Comments are closed.