'शहरी नक्षल' कोण आहेत?
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून उत्तर
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून पेलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘देशाला बौद्धिक नक्षलवाद्यांपासून सावध रहावे लागणार आहे’, असे प्रतिपादन केले आहे. या प्रतिपादनावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंबंधी काही महत्वाच्या बाबींवर सोमवारी प्रकाश टाकला आहे.
रिजिजू यांनी या विधानाचा संदर्भ स्पष्ट केला आहे. त्यानुसार तीन श्रेणींमध्ये समाविष्ट होणारे लोक हे ‘बौद्धिक नक्षलवादी’ असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान करून विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न मुळीच केलेला नाही. त्यांना अभिप्रेत असणारे लोक निराळेच असून ते तीन श्रेणींमध्ये समाविष्ट आहेत.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले…
नक्षलवादी हे केवळ वनप्रदेशांमध्येच असतात ही समजूत चुकीची आहे. नक्षली मनोवृत्तीचे लोक साळसूदपणे तुमच्या-आमच्यात पसरलेले असतात. सर्वसामान्य आणि भोळ्याभाबड्या लोकांचा बुद्धीभेद करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय असते. ते लोकशाही व्यवस्थेला आतून पोखरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी सत्तेच्या वर्तुळातही स्वत:ला प्रस्थापित पेले असून चांगल्या योजनांमध्ये मोडता घालण्याचा त्यांचा हेतू असतो. व्यवस्था सुधारण्यापेक्षा मोडणे त्यांना आवडते. अशांना ओखण्याची आणि त्यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे प्रतिपादन होते. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलेले आहे.
रिजिजू यांनी स्पष्ट केल्या तीन श्रेणी
किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात ‘एक्स’ या माध्यमावर संदेश प्रसारित केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तीन श्रेणींमध्ये येणारे लोक ‘नक्षलवादी मनोवृत्ती’चे असतात. हे लोक उघडपणे नक्षलवादाचा प्रचार किंवा प्रसार करत नाहीत. तथापि, लोकांची विविध मार्गांनी दिशाभूल करतात. त्यांना भडकविण्याचा प्रयत्न करतात.
‘बौद्धिक नक्षलवाद्यां’च्या तीन श्रेणी
- माओवाद्यांना समर्थन, घटनेला नकार
जे लोक माओवाद्यांना समर्थन देतात, त्यांची भलावण करतात आणि भारताच्या राज्यघटना नाकारतात ते ‘बौद्धिक नक्षलवादी’ आहेत. प्रत्यक्ष नक्षलवादी कोण आहे, याची व्याख्या कायद्यात करण्यात आली आहे. तथापि, हे लोक या कायद्याच्या चौकटीत येण्याचे शिताफीने टाळत असतात. पण नक्षलवादाचे समर्थक असतात. नक्षलवादाला बौद्धिक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न नेहमी करतात, असे रिजिजू म्हणाले.
- फुटीरतेला आणि 370 व्या अनुच्छेदाला समर्थन
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यासाठी भारताच्या राज्यघटनेत अनुच्छेद 370 चा समावेश करण्यात आला होता. या अनुच्छेदानेच या प्रदेशात फुटीरतेची बीजे रुजविली. हा अनुच्छेद केंद्र सरकारने संसदेच्या माध्यमातून 2019 मध्ये निष्प्रभ केला. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाटी याची आवश्यकता होती. तथापि, आजही काही लोक या अनुच्छेदाचे समर्थन करतात. या अनुच्छेदाच्या समर्थनाआडून फुटीरतावाद जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा प्रकारच्या लोकांच्या योजना हाणून पाडल्या पाहिजेत. कारण हे लोक ‘बौद्धिक नक्षलवादी’ असतात, असे रिजिजू यांनी त्यांच्या ‘एक्स’ वरील संदेशात स्पष्ट केले.
- ‘चिकन नेक’ तोडण्याचा प्रयत्न करणारे लोक
भारताची मुख्य भूमी आणि ईशान्य भारत यांना जोडणारी एक अरुंद आणि चिंचोळी भूमीपट्टी पश्चिम बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यात आहे. या पट्टीला ‘चिकन नेक’ असे म्हणतात. या पट्टीवर नियंत्रण मिळवून ईशान्य भारत भारतापासून तोडण्याची काही जणांची महत्वाकांक्षा आहे. सध्या अटकेत असणाऱ्या शर्जिल इमाम या फुटीरतावाद्यांना ही पट्टी तोडण्याची आणि ईशान्य भारत भारताच्या मुख्य भूमीपासून तोडण्याची भाषा केली होती. अशा प्रकारे भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि एकात्मता धोक्यात आणण्यासाठी फूस देणारे आणि इतरांना प्रोत्साहित करणारे लोक ‘बौद्धिक नक्षलवादी’ आहेत, असे रिजीजू यांनी स्पष्ट केले. त्यांनी सोमवारी या संबंधातील संदेश सोशल मीडियावर प्रसारित केलेला आहे.
स्पष्टीकरणाची आवश्यकता का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर विरोधकांनी त्यांच्या या विधानावर टीका केली. हे विधान त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना उद्देशून केले असा अर्थ त्यांच्याकडून लावण्यात आला. ‘मी बौद्धिक नक्षलवादी आहे, याचा मला अभिमान वाटतो,’ असे विधान माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले. त्यामुळे विरोधी पक्षांचे समधान करण्यासाठी किरेन रिजिजू यांनी हा संदेश प्रसारित केला आहे.
Comments are closed.