आयकर भवनला भीषण आग; अग्निशमन दलाची जिगरबाज कामगिरी, २७ जणांची सुखरूप सुटका
चर्चगेट स्टेशनजवळील आयकर भवनला आज दुपारी २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. तळघरात लागलेल्या आगीचे लोळ सातव्या मजल्यापर्यंत पसरल्याने शेकडो कर्मचारी असलेल्या इमारतीमध्ये मोठी घबराट पसरून पळापळ झाली. यावेळी इमारतीत आणि टेरेसवर अडकलेल्या २७ जणांची अग्निशमन दलाने जिगरबाज कामगिरी करीत सुखरूप सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला.
चर्चगेट स्टेशनच्या बाजूलाच आयकर भवनाची ही सात मजली इमारत आहे. सुमारे १५०० कर्मचारी काम करीत असताना या इमारतीच्या तळघरात दुपारी २ वाजून १ मिनिटांनी अचानक धूर येत असल्याचे समोर आले. तळघरातील सामानाला ही आग लागल्याने काही वेळातच मोठ्या प्रमाणात पसरली. ७ ते ८ हजार चौरस फूट जागेपैकी सुमारे पाच हजार चौरस फुटांमध्ये आग पसरली. त्यामुळे अवघ्या दहा मिनिटांत ही आग ‘लेव्हल-१’ची असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले.
आगीमुळे आरडाओरडा झाल्याने शेकडो कर्मचाऱ्यांनी इमारतीबाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाने ८ बंब आणि आवश्यक सामग्रीच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तळघरातील इलेक्ट्रिक वायरिंग, विद्युत उपकरणे, जुने रेकॉर्ड, लाकडी सामान आणि भंगार साहित्यामुळे आगीचा आणखी भडका उडाला. त्यामुळे २.४५ वाजताच्या सुमारास ही आग ‘लेव्हल-२’ची असल्याचे जाहीर केले.
अग्निशमन दलाने अथक प्रयत्नाने ही आग तळघराच्या वर पोहोचू दिली नाही. अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन, २ हाय प्रेशर लाइन आणि ७ होज लाईन्सच्या सहाय्याने सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. तर ७.३० वाजता आग पूर्ण आटोक्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत तळघरात अग्निशमन दलाकडून ‘कूलिंग ऑपरेशन’ सुरू होते, अशी माहिती अग्निशमन दल अधिकारी एस. डी. सावंत यांनी दिली.
शॉर्टसर्किटचा अंदाज
आयकर भवनात फायर फायटिंग सिस्टम कार्यान्वित असल्याचे समजते. मात्र तळघरात लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळेच आगीची ठिणगी पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या अग्निशमन दल, बेस्ट आणि पोलिसांकडून आगीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी तपासणी, चौकशी करण्यात येणार आहे.
मोठा अनर्थ टळला!
अग्निशमन दलाच्या जवानांनी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून १५ जणांना जिन्यावरून सुरक्षित बाहेर काढले, तर सहा जणांची शिडीच्या सहाय्याने सुटका करण्यात आली. शिवाय टेरेसवर अडकलेल्या आठ जणांचीही टर्न टेबल लॅडरच्या मदतीने सुरक्षितपणे सुटका करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
Comments are closed.