आणखी दोन वैमानिक चाचणीत नापास
एअर इंडियाची माहिती, सर्व वैमानिकांच्या चाचण्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फुकेत-दिल्ली विमान प्रवासात विमान अचानक खाली आल्याच्या घटनेनंतर एअर इंडियाने आपल्या सर्व विमान चालकांची अमली पदार्थ सेवन चाचणी प्रत्येक दिवशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या चाचणीत सोमवारी आणखी दोन वैमानिक अनुत्तीर्ण झाले आहेत. फुकेत-दिल्ली प्रवासातील घटना विमान चालकाच्या दुर्लक्षामुळे घडली, असा आरोप करण्यात येत आहे. विमान चालकाच्या रक्तात अमली पदार्थाचे अंश आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी जे आणखी दोन विमानचालक अमली पदार्थ सेवन चाचणीत दोषी आढळले आहेत, त्यांना त्वरित विमान उ•ाणाच्या कामापासून दूर करण्यात आले आहे. त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांचे रक्त नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीतही ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. त्यांच्या रक्तात अमली पदार्थांचा अंश का आढळून आला, याची चौकशीही करण्यात येत आहे. त्यांनी अमली प्रोत्साहित करणाऱ्या अमली पदार्थाचे सेवन केले असावे, किंवा अमली पदार्थाचा समावेश असणाऱ्या कोणत्यातरी औषधाचे सेवन केले असावे, असे प्राथमिक अनुमान आहे.
400 विमानचालकांची तपासणी
एअर इंडियाच्या साधारणत: 400 विमानचालकांचे आतापर्यंत अमली पदार्थ सेवन परीक्षण करण्यात आले आहे. त्यांच्यापैकी सोमवारी दोन विमानचालक चाचणीत अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या रक्तात मारिजुआना या अमली पदार्थाचे अंश आढळून आले आहेत. प्रथम स्क्रिनिंगमध्ये ते दोषी आढळल्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने पुढच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी…
आपल्या सर्व विमान चालकांचे सखोल परीक्षण करण्याचा निर्णय एअर इंडियाने आपल्या विमान प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी घेतला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या नियमानुसार एकंदर विमानचालकांच्या संख्येच्या 10 टक्के इतक्या प्रमाणात रँडम परीक्षण केले तरी पुरेसे असते. तथापि, एअर इंडियाने सर्व विमानचालकांचे परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. विशिष्ट प्रकारचे पदार्थ आणि औषधे विमानचालकांनी घेऊ नयेत, असाही नियम आहे. या नियमाचा भंग करणाऱ्या विमानचालकांच्या विरोधातही कंपनी कारवाई करत असून परीक्षणात अपयशी ठरणाऱ्यांना या कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा इशारा विमान प्राधिकरण आणि कंपनीकडून देण्यात आला.
Comments are closed.