हिंदुस्थानच्या आघाडीला सुथारची धार; श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांत आटोपला, टीम इंडियाकडे १७८ धावांची आघाडी

तो आला आणि पहिल्याच चेंडूवर विकेट काढत त्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. ही गोष्ट आहे ती टीम इंडियाकडून फक्त दुसराच सामना खेळणाऱ्या मानव सुधारची. पहिल्याच सामन्यात ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावणाऱ्या सुथारने श्रीलंकेतील पहिल्याच सामन्यात आपली चुणूक दाखवून दिली. सुथारने चार विकेट्स काढत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले आणि त्यामुळे हिंदुस्थानच्या आघाडीला त्याच्या फिरकीची धार चढली.

भारताचा पहिला डाव ४६२ धावांवर संपुष्टात आल्यावर श्रीलंकेचा संघ फलंदाजीला आला, पण मानवच्या फिरकीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. त्यामुळे हिंदुस्थानला श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांत गुंडाळता आला आणि १७८ धावांची भक्कम आघाडी मिळवता आली. भारताला श्रीलंकेवर फॉलोऑन लादता आला नसला तरी चौथ्या दिवशी मोठे आव्हान ठेवण्याची
सुवर्णसंधी असेल. हिंदुस्थानच्या डावाचा शेवट आणि श्रीलंकेची वाईट सुरुवात तिसऱ्या दिवशी सकाळी हिंदुस्थानचा पहिला डाव अवघ्या चार चेंडूंमध्ये ४६२ धावांवर संपला.

प्रत्युत्तरात श्रीलंकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात निशान फर्नांडोला (०) बाद केले. त्यानंतर मानव सुथारने लहिरू उदारा (२७) आणि दिनेश चंडीमल (४) यांना बाद करत श्रीलंकेला दुहेरी धक्के दिले. त्यानंतर कुलदीप यादवने कामिंदू मेंडिसला (१४) बाद केले, ज्यामुळे श्रीलंकेची धावसंख्या ५७/४ झाली. त्यानंतर धनंजय डी’सिल्वा (२१) देखील जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि श्रीलंकेने अवघ्या ९० धावांत पाच महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या.

फॉलोऑन टाळत श्रीलंकेचे पुनरागमन
९० धावांत पाच विकेट्स गमावल्यानंतर श्रीलंकेवर डावाने पराभव आणि फॉलोऑनचे गंभीर संकट आले होते. पण तिथून पुढे सोनल दिनुशा आणि निरोशन डिकवेला यांनी सामन्याचे चित्र पालटले. या दोन फलंदाजांनी सहाव्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली.

दिनुशाचे झुंजार शतक
दिनुशाने झुंजार शतकाच्या जोरावर श्रीलंकेच्या डगमगत्या डावाला सावरले. जेव्हा संघ केवळ ९० धावांत ५ फलंदाज गमावून प्रचंड दबावाखाली होता, तेव्हा दिनुशाने संयम दाखवत खेळपट्टीवर आपली पकड टिकवून ठेवली. डिकवेलाने आक्रमक पवित्रा घेत सात चौकारांच्या मदतीने ११५ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या. दुसऱ्या बाजूला दिनुशाने खंबीरपणे फलंदाजी करत, ४ चौकार आणि २ षटकारांसह १६८ चेंडूंमध्ये १०० धावांची संघर्षपूर्ण खेळी साकारली. या १४६ धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेला केवळ बिकट परिस्थितीतून सावरण्यास मदत झाली नाही, तर संघाला फॉ लोऑन टाळून २८४ अशी धावसंख्याही गाठता आली.

अखेर जोडी फुटली
प्रसिध कृष्णाने डिकवेलाला बाद करून ही धोकादायक भागीदारी फोडली. त्यानंतर रवींद्र जडेजाने दिनुशाला पायचीत करून त्याला शतकानंतर एकही धाव करू दिली नाही. श्रीलंकेच्या तळाचे फलंदाज लवकर बाद झाले. संपूर्ण संघ २८४ धावांवर सर्व बाद झाला.

सुधारला मिळाली जाडेजाची साथ
सुथारला यावेळी रवींद्र जाडेजाची सुरेख साथ मिळाली. मानवने या सामन्यात २१.४ षटके टाकत ७६ धावांत चार विकेट्स मिळवल्या, तर जाडेजाने २१ षटकांत ५७ धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. त्यामुळे या दोघांनीच सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. प्रसिध, सिराज आणि कुलदीप यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

शुभमन गिलचा भन्नाट झेल
शुभमन गिलने या सामन्यात एक भन्नाट झेल घेत सवचिच लक्ष वेधून घेतले. ही गोष्ट घडली ती १७ व्या षटकात. कुलदीप यादव गोलंदाजीसाठी आला. कामिंदू मेंडिस त्याच्यासमोर उभा राहिला. पहिल्याच चेंडूवर मेंडिसने थोडे पुढे सरकून शॉर्ट कव्हरला उभ्या असलेल्या गिलच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पण गिल सावध होता. त्याने डावीकडे झेप घेतली आणि चेंडू पकडला. तो झेल उल्लेखनीय ठरला. कारण जेव्हा गिलने चेंडू पकडला, तेव्हा तो जवळजवळ जमिनीला स्पर्श करत होता. हा झेल खरंच पकडला गेला का, यावर मेंडिसचा विश्वासच बसत नव्हता. गिलचा झेल पाहून संघातील खेळाडूही थक्क झाले.

Comments are closed.