देवेंद्रजींना राष्ट्र साद घालतंय, त्यांना दिल्लीत जावंच लागेल – संजय राऊत
जंतरमंतरच्या प्रकरणानंतर पंतप्रधानांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे. त्यासाठी ते फडणवीसांना तिथे बोलवत आहेत असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, पंतप्रधान त्यांच्या सहकाऱ्यांना सांगताहेत त्यांना फडणवीस केंद्रात हवे आहेत आणि कालसुद्धा 100 टक्के देवेंद्रजींना सांगितलं असलेच. देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील.
दिल्लीत जाण्याविषयीचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडला यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, महाराष्ट्रातून अनेकजण दिल्लीला गेलेले आम्ही पाहिलेत. त्यावेळी मूळ घर आवरावं लागतं. आपापल्या माणसांची व्यवस्था करावी लागते. देवेंद्रजींना राष्ट्र साद घालतंय.
संजय राऊत या विषयावर अधिक बोलताना म्हणाले, देवेंद्रजींना दिल्लीची गरज नाही, परंतु दिल्लीला मात्र त्यांची गरज आहे. राष्ट्र त्यांना साद घालतंय. दिल्लीतील कॅबिनेट ढिसाळ आहेत. पंतप्रधानांना उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे त्यासाठी त्याना देवेंद्र फडणवीस तिथे दिल्लीत आवश्यक आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना इथे राज्यात राहण्याची खूप इच्छा असेल, परंतु तुमच्या आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसलेत असे यावेळी राऊत म्हणाले. आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सद्भावना आहेत. परंतु त्यांच्या आजूबाजूच्यांच्या लोकांच्या मात्र सदभावना नाही ते कधी एकदा दिल्लीला जाताहेत असे अनेकांना झालं आहे. त्यामुळेच देवेंद्रजींना तुम्ही दिल्लीत घेताय आता आमचं तरी करा अशी वाट बघणारी लोकं आहेत असे म्हटले.
मी इथेच राहीन असं देवेंद्रजी म्हणत असले तरी ते इथेच राहणार नाहीत असे राऊतांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले. मी पुन्हा येईन असे ते म्हणाले होते. परंतु ते पुन्हा आले नाहीत. त्याकरता त्यांना शिवसेना फोडावी लागली, राज्यपालांना मॅनेज करावं लागलं. ५० कोटींना माणसं विकत घ्यावी लागली. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आले. त्यामुळे मी इथेच राहीन हे इथेच राहणं अवघड आहे. उलट ते आम्हाला इथे हवेत. परंतु त्यांना राष्ट्र पुकारतंय असे विधान यावेळी राऊतांनी केले.
मंत्रीमंडळ विस्ताराविषयी माध्यमांनी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्याला सामावून घेण्यासाठी किंवा मंत्रीमंडळात फेरबदल करण्यासाठी विस्तारासाठी एक तास पुरेसा असतो. आता चार मंत्री घेतलेत म्हणून पाचवा घ्यायचा नाही असे काही संविधानात लिहिलेलं नाही. एक पत्र राष्ट्रपती किंवा राज्यपालाला पाठवायचं असतं. त्यांना शपथ द्यायची असते असे झालेले आहेत कार्यक्रम.
धर्मेंद्र प्रधान हे पुन्हा एकदा कमबॅक करणार या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, ते त्यांच्या शिक्षण खात्यामध्ये उत्तम काम करू शकले नाहीत. म्हणून देशामध्ये त्यांच्या विरोधात एक आंदोलन अगदी अलीकडेच झालं. या आंदोलनाला अद्याप महिनाही झाला नाही. त्यानंतर दबावाखाली पंतप्रधानांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रधानांना परत घ्यायचं असेल तर, देशातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करायला हवा.
Comments are closed.