आंबा घाटात सापडलेली रोकड व बॅग महामार्ग पोलिसांनी केली मालकाच्या स्वाधीन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर -कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट परिसरात पेट्रोलिंग करत असताना महामार्ग पोलीस पथकाला बेवारस अवस्थेत आढळून आलेली बॅग शोधून तिच्या मालकाचा संपर्क साधत रोख रक्कमेसह सर्व साहित्य सुरक्षितपणे परत करण्यात आले. पोलिसांच्या या प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

महामार्ग पोलीस पथक हातखंबाचे पोलीस कॉन्स्टेबल खामकर, पोलीस कॉन्स्टेबल जाधवर पोलीस कॉन्स्टेबल शिंगाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल दाभाडे हे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाट परिसरात नियमित पेट्रोलिंग करत असताना त्यांना महामार्गाच्या कडेला एक बेवारस बॅग आढळून आली. पोलिसांनी बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये विविध कागदपत्रे, रोख 14 हजार 300 रुपये, कपडे तसेच अन्य साहित्य आढळून आले. बॅगेतील कागदपत्रे व इतर वस्तूंच्या आधारे ही बॅग आकाश दयानंद भोई (वय 22, रा. खांदे गल्ली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांची असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. आकाश भोई हे कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत असल्याचे समजल्यानंतर त्यांना परत बोलावून त्यांची ओळख व बॅग त्यांच्या मालकीची असल्याची खात्री करण्यात आली.

ओळख निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी बॅगेतील रोख रक्कम 14 हजार 300 रुपये तसेच कागदपत्रे, कपडे आणि अन्य सर्व साहित्य सुरक्षितपणे आकाश भोई यांच्या ताब्यात दिले. अचानक हरवलेली बॅग आणि त्यातील रोख रक्कम व साहित्य कोणतीही हानी न होता परत मिळाल्याने संबंधित वाहनचालकाने महामार्ग पोलीस पथकाचे आभार मानले. महामार्गावर कर्तव्य बजावत असताना सापडलेल्या मौल्यवान वस्तू स्वतःकडे न ठेवता त्या प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचविणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल खामकर, पोलीस कॉन्स्टेबल जाधवर, पोलीस कॉन्स्टेबल शिंगाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल दाभाडे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. त्यांच्या या आदर्शवत कार्यातून पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेसोबतच सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिकपणाचेही दर्शन घडले असून, या कार्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.