कोलकाता येथे लागलेल्या आगीत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू.

अपार्टमेंटमधील हॉटेल्सना मध्यरात्री आग : अनेकांचा बचाव

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका भीषण आगीमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शहरातील गजबजलेल्या मिर्झा गालिब स्ट्रीट येथील एका हॉटेल्स असलेल्या बहुमजली इमारतीमध्ये अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका लहान मुलासह एकूण 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुमारे 1:45 वाजता कोलकातामधील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील पाच मजली इमारतीला आग लागली. बुधवारी पहाटेच्या सुमारास पर्यटक गाढ झोपेत असतानाच ही दुर्घटना घडली. काही क्षणांतच हॉटेलच्या खोल्यांमध्ये आणि कॉरिडोअरमध्ये दाट धूर पसरल्यामुळे लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. धुरामुळे गुदमरून आणि आगीच्या तावडीत सापडलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू केली. यातील काही जणांना वाचविण्यात यश मिळाले. तर, अनेकजण हॉटेलमध्येच अडकून पडले. बचावकार्यादरम्यान 80 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तर दोन महिला आणि एका चार वर्षांच्या मुलासह नऊ जणांचा मृत्यू झाला.

आगीच्या दुर्घटनेवेळी हॉटेलमधील बहुतेक कर्मचारी झोपलेले होते. इमारतीत धूर पसरल्याने त्यांचाही गुदमरून मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढू शकतो. आगीची माहिती मिळताच पाच अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. दाट धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचण्यास अडचण येत होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, परंतु इमारत अजूनही खूप गरम असल्याने कुलिंगचे काम सुरू आहे.

शॉर्ट सर्किटचा संशय

घटनास्थळाला भेट दिल्यानंतर पश्चिम बंगाल अग्निशमन विभागाचे मंत्री कौशिक चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्राथमिकदृष्ट्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे, परंतु फॉरेन्सिक तपासणीनंतर याची पुष्टी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. इमारतीमधील परिस्थिती अत्यंत वाईट होती आणि तिथे अनेक हॉटेल्स कार्यरत होती. तेथील परिस्थिती पाहून आपल्याला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. इमारत व्यवस्थापनाने मूलभूत सुरक्षा आणि बांधकाम नियमांचे पालन केले नव्हते. हॉटेलच्या कामकाजात विविध अनियमिततांच्या तक्रारीही नोंदवण्यात आल्या आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

इमारतीचा मालक फरार, गुन्हा दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, इमारतीचा मालक सध्या फरार आहे. या दुर्घटनेप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मालकाच्या शोधात त्याच्या घरासह अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. आगीचे कारण आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी सुरू आहे.

Comments are closed.