मंत्र्यांच्या कुत्र्यांनाही विद्यार्थ्यांपेक्षा चांगल्या सुविधा मिळतात; सरकारी शाळांच्या दुरवस्थेवरून अभिजित दीपके यांचा सरकारवर घणाघात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सरकारी शाळांच्या दुरवस्थेवरून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “राज्यातील सरकारी शाळांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मंत्र्यांच्या कुत्र्यांना मिळतात,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. या दुरवस्थेला जबाबदार धरत त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत अभिजित दिपके यांनी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. या दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शाळांमधील पायाभूत सुविधांच्या अभावावर बोट ठेवले. बहुतांश शाळांमध्ये वर्गखोल्या, बसण्यासाठी बाक, स्वच्छतागृहे आणि शाळेकडे ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते यांसारख्या मूलभूत सोयींचाही अभाव आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि जीवाचा प्रश्न आहे. राजकीय नेते विद्यार्थ्यांसाठी काहीही करत नसतील, तर जनतेने त्यांना मते का द्यावीत? लोकांनी केवळ नेत्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवण्यासाठी मते दिली आहेत का? पालकांनी आपल्या मुलांच्या शाळांची अवस्था प्रत्यक्ष पाहिली पाहिजे,” असे दीपके म्हणाले. तसेच शिक्षणावर काम केल्याशिवाय कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना मतांसाठी गावाच्या उंबरठ्यावर येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्माचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी आणि शाळांच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

Comments are closed.