ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू आता पोर्तुगालचा ‘हिरो’! 217 च्या स्ट्राईक रेटने ठोकलं तुफानी शतक

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईसेस हेन्रिक्स आता पोर्तुगालसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. नुकतेच या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने एक शानदार शतक झळकावले. त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिलेच शतक ठरले.

हेन्रिक्सने 2009 ते 2021 या काळात ऑस्ट्रेलियासाठी 11 टी-20 सामने खेळले, ज्यात त्याने एकूण 135 धावा केल्या आणि 3 बळी घेतले. याव्यतिरिक्त, त्याने आयपीएलमध्ये विविध संघांसाठी 62 सामने खेळले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याची पोर्तुगाल संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

फिनलंडमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक पात्रता स्पर्धेत, पोर्तुगालकडून खेळताना मोईसेस हेन्रिक्सने झेक प्रजासत्ताकविरुद्ध केवळ 51 चेंडूत 111 धावांची धडाकेबाज खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने 217.64 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. हेन्रिक्सच्या या शानदार शतकाच्या जोरावर, प्रथम फलंदाजी करताना पोर्तुगालने 20 षटकांत 6 बाद 211 धावांचा डोंगर उभारला.

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी झेक प्रजासत्ताकचा संघ फलंदाजीला उतरला. मात्र, पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा त्यांनी 8.5 षटकांत केवळ 24 धावांत 5 बळी गमावले होते. डीएलएस (DLS) पद्धतीनुसार पोर्तुगालने झेक प्रजासत्ताकचा 91 धावांनी पराभव केला. स्पर्धेतील पोर्तुगालचा हा सलग चौथा विजय ठरला. आता पोर्तुगालचा सामना 21 ऑगस्ट रोजी स्पेनशी होणार आहे.

या सामन्यातील विजेता संघ 2028च्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकाच्या पुढील पात्रता फेरीत आपले स्थान निश्चित करेल. दरम्यान, स्पेनचा संघ ‘गट अ’ (Group A) मध्ये अपराजित असून त्यांनी सलग चार सामने जिंकले आहेत. मागील सामन्यात त्यांनी बल्गेरियाचा 9 गडी राखून पराभव केला होता.

पोर्तुगालचा पुढील सामना स्पेनविरुद्ध आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईसेस हेन्रिक्स सध्या पोर्तुगीज संघासाठी उत्कृष्ट लयीत खेळत आहे.

पोर्तुगालमध्ये जन्मलेला ३९ वर्षीय हेन्रिक्स पहिल्यांदाच या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. त्याने तीन डावांत एकूण 178 धावा केल्या आहेत.

Comments are closed.