लॉर्ड्सवर ‘दादा स्टाइल’ सेलिब्रेशन! हिंदुस्थानच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा इंग्लंडवर विजय
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक बाल्कनीत पुन्हा एकदा तिरंगा डौलाने फडकला व २४ वर्षांपूर्वीच्या सौरव गांगुलीच्या दणदणीत जल्लोषाच्या आठवणी जाग्या झाल्या. हिंदुस्थानच्या मिश्र दिव्यांग क्रिकेट संघाने इंग्लंडचा ११८ धावांनी धुव्वा उडवत सात सामन्यांच्या मालिकेचा शेवट गोड केला. यजमान इंग्लंडने मालिका ४-३ अशी जिंकली असली, तरी अंतिम सामन्यात हिंदुस्थानने बाजी मारली.
हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २०६ धावांचा डोंगर उभारला. अर्जुन गावरेने ४४ चेंडूंत ६८ धावांची तडाखेबंद खेळी केली. कर्णधार माजिद मगरेने अवघ्या १९ चेंडूंत नाबाद ६३ धावा ठोकत हिंदुस्थानची धावसंख्या दोनशेपार नेली. साई आकाशनेही मोलाचे योगदान दिले. या धावांच्या डोंगरासमोर इंग्लंडचा डाव पुरता कोसळला. हिलाल अहमद वानीने २१ धावांत चार बळी घेतले, तर जयेश परमारने १४ धावांत तीन बळी टिपले. हिंदुस्थानी गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ अवघ्या ८८ धावांत गारद झाला.
विजयानंतर हिंदुस्थानी खेळाडू आणि अधिकारी लॉ र्ड्सच्या बाल्कनीत पोहोचले. ब्लेझर काढून हातात तिरंगा घेत त्यांनी जल्लोष केला. २००२च्या नॅ टवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला त्याच मैदानावर पराभूत केल्यानंतर सौरव गांगुलीने शर्ट काढून बाल्कनीत फडकावला होता. त्या ऐतिहासिक क्षणाचीच जणू पुनरावृत्ती हिंदुस्थानी दिव्यांग संघाने केली.
Comments are closed.