जागतिक बॅडमिंटन स्पर्धा – त्रिशा-गायत्री आणि सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत; सिंधू, आयुष पराभूत
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा गाजवणाऱ्या आयुष शेट्टीसह पी. व्ही. सिंधूलाही गुरुवारी पराभवाचा धक्का बसला. मात्र, महिलांच्या दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने उपांत्य फेरीत मजल मारली आहे.
आयुषची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील वाटचाल अल्वी फरहानविरुद्धच्या पराभवाने संपली. त्याला इंडोनेशियाच्या अल्वी फरहानकडून १९-२१,११-२१ असा पराभव पत्करावा लागला. आयुषनंतर सर्वांच्या नजरा सिंधूकडे वळल्या होत्या. सिंधूने पहिला गेम गमावला असला, तरी तिने दुसरा गेम जिंकत सामन्यात दमदार पुनरागमनही केले होते. तिसऱ्या गेममध्ये सिंधू सुरुवातीला दमदार आघाडीवर होती. पण त्यानंतर प्रतिस्पर्धी चीनच्या वँग झियीने जोरदार मुसंडी घेत सिंधूला पराभूत केले आणि हिंदुस्थानला मोठा धक्का दिला. वँगने सिंधूवर २१-११, १५-२१, १७-२१ असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली.
त्रिशा-गायत्री जोडी सुसाट!
त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या हिंदुस्थानच्या महिला दुहेरी जोडीने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हिंदुस्थानच्या गैरमानांकित जोडीने सातव्या मानांकित जपानच्या रिन इवानागा आणि की नाकानिशी यांना सरळ दोन गेममध्ये २१-१६, २१-१२ असे लोळवले. सामन्याच्या पहिल्याच क्षणापासून त्रिशा-गायत्री जोडीने जपानी जोडीवर दबाव कायम ठेवला. त्रिशाच्या आक्रमक खेळाने प्रतिस्पर्थ्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. कोर्टच्या मागील भागातून ताकदीचे फटके आणि नेटजवळ अचूक शॉट्सचा मारा करत हिंदुस्थानी जोडीने जपानला पुनरागमनाची संधीच दिली नाही.
सात्विक-चिरागचे जबरदस्त कमबॅक
दुसरीकडे पुरूष दुहेरीमध्ये पाचव्या मानांकित सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी जुनैदी आरिफ आणि याप रॉय किंग या मलेशियन जोडीचा २१-२३, २१-१९, २१-१७ असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये दोन गेम पॉइंट्स वाचवूनही गेम गमावल्यानंतर सात्विक आणि चिरागने जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या गेममध्ये १६-१८ ने मागे असताना त्यांनी विजय मिळवला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये १२-१५ ने मागे असताना, त्यांनी आधी १७-१७ अशी बरोबरी साधली आणि सलग चार गुण घेत सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना चीनच्या तिसऱ्या मानांकित लिअंग वेई केंग आणि वांग चांग या जोडीशी होईल.
Comments are closed.