मुलींच्या फिटनेससाठी सोपे व्यायाम
लहान मुलींची वाढ ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी असते. या काळात शरीरात अनेक नैसर्गिक बदल होत असतात. त्यामुळे मुलींना अगदी लहान वयापासून व्यायामाची सवय लावणे फायदेशीर ठरू शकते. व्यायाम म्हणजे फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा एखादा शारीरिक बदल रोखण्यासाठी नाही, तर शरीर मजबूत, लवचिक आणि सक्रिय ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
खेळातून व्यायामाची सवय
लहान मुलींना व्यायाम करायला सांगण्यापेक्षा त्यांना खेळायला प्रोत्साहन देणं अधिक सोपं आणि आनंददायी ठरू शकतं. धावणे, सायकल चालवणे, पोहणे, दोरीवर उड्या मारणे किंवा मैदानी खेळ यामुळे शरीराची हालचाल वाढते आणि मुलींमध्ये शारीरिक सक्रियतेची सवय लागते.
सूर्यनमस्कार
वय आणि शारीरिक क्षमतेनुसार योग्य पद्धतीने सूर्यनमस्कार करता येतात. यामुळे शरीरातील विविध स्नायूंची हालचाल होते आणि लवचिकता वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र लहान मुलींनी सूर्यनमस्कार प्रशिक्षित व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने शिकणे चांगले.
बटरफ्लाय पोझ
जमिनीवर बसून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना लावून गुडघे हलक्या हाताने वर खाली करण्याची ही सोपी हालचाल आहे. मुलांना जबरदस्तीने गुडघे खाली दाबू नयेत. आरामदायी पद्धतीने केल्यास शरीराची हालचाल आणि लवचिकता वाढवण्यास मदत होऊ शकते.
दोरीवर उड्या
दोरीवर उड्या मारणे हा मुलांसाठी मजेदार आणि सक्रिय व्यायाम आहे. सुरुवातीला कमी वेळ उड्या मारून हळूहळू वेळ वाढवता येतो. मात्र जागा सुरक्षित असावी आणि योग्य पादत्राणे वापरणे महत्त्वाचे आहे.
सायकलिंग आणि पोहणे
सायकलिंग आणि पोहणे हे मुलींच्या फिटनेससाठी चांगले पर्याय आहेत. या दोन्ही उपक्रमांमुळे शरीराची हालचाल वाढते आणि व्यायामाचा कंटाळा न येता सक्रिय राहता येते. पोहताना मात्र नेहमी मोठ्यांची देखरेख आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे.
मैदानी खेळ
बॅडमिंटन, खो खो, कबड्डी, फुटबॉल किंवा धावण्यासारखे खेळ मुलींना नियमित शारीरिक हालचालीत ठेवू शकतात. मुलींना त्यांच्या आवडीचा खेळ निवडू द्या. व्यायाम हा शिक्षा किंवा वजन कमी करण्याचा मार्ग न बनवता आनंदाचा भाग असायला हवा.
Comments are closed.