Chandrapur News – राजुरा न्यायालयासमोर गोळीबार प्रकरणी आणखी दोघांना अटक
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात भरदिवसा एका तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. न्यायालय परिसरासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पापा ऊर्फ विनोद जाधव हे न्यायालयासमोर एका नारळ पाण्याच्या दुकानाजवळ बसले असताना, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अगदी जवळून थेट डोक्यात तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या विनोद जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
हत्येनंतर हल्लेखोर करण मेकलवार आणि करण बाविसकर यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी तत्पर कारवाई करत परवेश शेख आणि कार्तिक खामनकर या आणखी दोघांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला, तर संतप्त जमावाने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनाची तोडफोड केली. सध्या राजुरा शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Comments are closed.