राणांच्या हनुमान गढीला 121 कोटी दिले, स्त्री रुग्णालयाला साडेनऊ कोटी मिळेनात; अमरावती रुग्णालयाची शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून पाहणी
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील सोयीसुविधांसाठी साडेनऊ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असताना तो दिला गेला नाही, मात्र माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हनुमान गढीसाठी 121 कोटी देण्यात आल्याचे वास्तव शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान समोर आणले आहे.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडात तीन बालकांचा मृत्यू झाल्याने येथील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार नितीन देशमुख, आमदार गजानन लवटे, संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट देऊन येथील अपुऱ्या सोयीसुविधांबाबत रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाला जाब विचारला. रुग्णालयातील सुविधांबाबत पाच ते सहा वेळा पत्रव्यवहार करूनदेखील आवश्यक निधी मिळाला नसल्याचे यावेळी उघडकीस आले.
रुग्णालयातील वास्तव काय?
• पिण्याच्या पाण्यात अळ्या सापडल्या
• पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर नाही
• ऑपरेशन थिएटरमध्ये एसी बंद आहे
• रुग्णालयातील सीसीटीव्ही बंद आहेत
• व्हेंटिलेटर ऑडिट झाले नाही
• ट्रान्सफॉर्मर डीपीची 14 महिन्यांपासून दुरुस्ती झालेली नाही
• फायर ब्रिगेड, इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट झाले नाही
• रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट नाही
राणांसाठी सरकारी तिजोरी खुली रुग्णालयातील सोयीसुविधांसाठी निधी दिला जात नाही, पण राणा दाम्पत्याच्या हनुमान गढी प्रकल्पासाठी तिजोरीच्या किल्ल्या कशा काय सापडतात? अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यासाठी तत्परता कशी दाखवतात? बालकांच्या आरोग्याशी सरकारने खेळू नये, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.
Comments are closed.