महाराष्ट्रातील 199 पर्यटक सुखरूप, महाराष्ट्रातील 199 पर्यटक सुखरूप; 106 जण हिंदुस्थानात दाखल, आज आणखी 84 परतणार

राज्यातून नेपाळमध्ये पर्यटन, कैलास मानसरोवर यात्रा, गिर्यारोहणासाठी गेलेल्या 395 लोकांची यादी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आली आहे. त्यातील 199 जणांचा ठावठिकाणा लागला असून 106 जण हिंदुस्थानात सुखरूप परतले आहेत. उद्या आणखी 84 जण हिंदुस्थानात परतणार आहेत. 196 पर्यटक अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

नेपाळमध्ये गेलेले नागपूर जिह्यातील सर्व 106 नागरिक सुखरूप आहेत. त्यापैकी 4 नागरिक विमानाने दिल्ली येथे सुखरूप पोहोचले असून उर्वरित 102 नागरिक बस मार्गे हिंदुस्थानात दाखल झाले आहेत. 102 नागरिक बिहार राज्यातील सीतामढी जिह्यात असून ते पाटणा येथे मुक्काम करून उद्या 29 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजताच्या रेल्वेने पटणा येथून नागपूरकडे रवाना होणार आहेत. नाशिक जिह्यातील पेठ येथील 11 नागरिक काठमांडू येथे असून त्यांना मदतीसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत.

अहिल्यानगरमधून गेलेले 45 पर्यटक आज अयोध्येकडे रवाना होणार

अहिल्यानगर जिह्यातील संगमनेर येथील टूर ऑपरेटर दर्शन गुंजाळ यांनी नेपाळमध्ये नेलेल्या 45 जणांच्या ग्रुपमध्ये अहिल्यानगर (27), नाशिक (12), पुणे (5), मुंबई (1) जिह्यांतील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती दिली. हा ग्रुप नेपाळ येथील चितवन येथे आहे. सर्व जण सुखरूप आहेत. सद्यस्थितीत काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्यामुळे ते लुंबिनी येथे मुक्काम करून उद्या अयोध्याकडे निघणार असल्याचे  ट्रव्हल्सच्या निर्मलाताई गुंजाळ यांनी कळविले आहे. त्यांना शासन स्तरावरून मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

नाशिकमधील 11 नागरिक काठमांडूत

नाशिक जिह्यातील पेठ येथील 11 नागरिक काठमांडू येथे असून त्यांना मदतीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात आहेत.

हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आला आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून मदतीसाठी 1070 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.  नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तत्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे 37 पर्यटक काठमांडू येथून आज परतणार

प्रमोद केने, शशिकांत पानगावकर, दतात्रय जोशी, हेमंत दांडेकर, नितीन गांधी, दिनेश गांधी, बजरंग परब, संतोष आलुरकर, समीर घोडेराव, राकेश जितेकर, श्रीकांत ढवले, सुरेंद्र जोशी, श्रीकांत पाटील, आदित्य देशमुख, नितीन शिर्पे, संजय देशपांडे, विवेक पांडे, सोनाली बेलोसे, सुनीता पानगावकर, स्नेहा कुलकर्णी, सुवर्णा जोशी, वृषाली पुराणिक, रश्मी सेठ, पूनम सबनीस, शमा साठे, रेणुका आलुरकर, आरती काकरमठ, अपर्णा कदम, माधवी जोशी, रुचा पाटील, सोनल जोशी, सीमा शिंपी, हेमलता बोरसे, अंजना राजपूत, संगीता देशपांडे, स्नेहा पांडे, वर्षा कारी.

37 पर्यटक तिबेटमधून काठमांडूत दाखल

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील 37 भाविक अडकले होते. ते सर्व भाविक आज पहाटे 6 वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्ट मार्गे सुखरूप काठमांडूला पोहोचले. या भाविकांमध्ये दोन डॉक्टरांसह ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा समावेश आहे. हे सर्व जण 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या विमानाने परतणार आहेत.

मुंबईतील 120 जणांचा शोध सुरूच

मुंबईतील ‘हिल्स अँड ट्रेल्स’च्या 59 व ‘कपिल टूर्स’च्या माध्यमातून 61 पर्यटक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. सर्व पर्यटक बुधवारी सकाळी तिबेटच्या कस्टम्स व इमिग्रेशन इमारतीत तसेच परिसरात होते. त्याच वेळी त्या परिसराला भीषण महापुराचा जोरदार फटका बसला. पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे संपूर्ण इमिग्रेशन इमारतच वाहून गेली. त्यामुळे मुंबईतील यात्रेकरूंबाबत चिंता वाढली आहे.

डॉ. मिलिंद चितळे यांच्याशी संपर्क तुटला

30 वर्षांपेक्षा जास्त काळ हिमालय भ्रमंती करणारे मुंबईतील गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही संपर्क झालेला नाही. ‘हिल्स अँड ट्रेल’ या त्यांच्या ट्रेकिंग संस्थेच्या माध्यमातून भाविकांचा समूह कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेला होता. या गटामध्ये डॉ. चितळे, त्यांच्या पत्नी जान्हवी चितळे आणि मुंबईतील अनेक जण सहभागी होते.

Comments are closed.