लालपरीच्या ‘गणपती स्पेशल’ गाडय़ा फुल्ल, ग्रुप बुकिंगचा 387 बसचा रेकॉर्ड; मुंबईतून 612 गाडय़ा
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाच्या मुंबई विभागातून कोकणात जाणाऱया विशेष गाडय़ांच्या आरक्षणांतर्गत 612 गाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यात तब्बल 387 गाडय़ांच्या ग्रुप बुकिंगचा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.
एसटीच्या भाडय़ात वाढ होऊनसुद्धा गणेशभक्तांकडून लालपरीलाच पसंती दिली जात आहे. मुंबई सेंट्रल, परळ आणि पुर्ला या तीन प्रमुख आगारांतून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिह्यांत जादा गाडय़ा धावणार आहेत. यंदा एसटी महामंडळाने 5200 जादा गाडय़ा चालवण्याची तयारी केली आहे.
11 व 12 सप्टेंबरसाठी सर्वाधिक आरक्षण
गणेशभक्तांकडून 11 आणि 12 सप्टेंबरसाठी सर्वाधिक गाडय़ांचे आरक्षण करण्यात आले आहे. 11 सप्टेंबरसाठी 197 आणि 12 सप्टेंबरसाठी 385 गाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एसटीच्या वाहतूक विभागाने दिली.
30 टक्के भाडेवाढ रद्द झाल्यानंतर बुकिंगला गती
गणेशभक्तांच्या तीव्र विरोधानंतर 30 टक्क्यांची भाडेवाढ रद्द करण्यात आली. त्यानंतर आरक्षणाला गती मिळाली. गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाच्या माध्यमातून मुंबई विभागातून 150 गाडय़ांचे आरक्षण करण्यात आल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली. रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने दरवर्षी गणेशभक्तांना एसटीचाच मोठा आधार ठरत असल्याचे बळीराम राणे यांनी सांगितले.
Comments are closed.