वय फक्त आकडा…10 धावांत घेतल्या 5 विकेट्स; 51 वर्षांच्या महिला खेळाडूचा वर्ल्ड रेकॉर्ड, 96 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामान्यत: वयाच्या चाळीशीपर्यंत बहुतांश खेळाडू निवृत्ती स्वीकारतात. काही खेळाडू 42-45 वर्षांपूर्यंतही कारकिर्द लांबवतात. पण ज्या वयात निवृत्त होऊन उर्वरित आयुष्य आरामात जगायला सुरुवात करतात, त्याच वयात एका महिला खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि मैदान गाजवलेही. आयल ऑफ मॅनच्या जोआन हिक्स (वय – 51) असे या महिला खेळाडूचे नाव असून त्यांनी 47 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आता अविश्वसनीय कामगिरी करत 96 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
महिला कॉन्टिनेंटल कपच्या सामन्यात ग्रीसविरुद्ध खेळताना ऑफ-स्पिनर जोआन हिक्स यांनी केवळ 10 धावा देत 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या कामगिरीसह त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाची 50 वर्षे पूर्ण केल्यानंतर एकाच सामन्यात 5 बळी घेणाऱ्या जगातल्या पहिल्या गोलंदाज ठरल्या आहेत. हिक्स यांनी 51 वर्षे आणि 171 दिवस वयात हा पराक्रम केला आहे.
दरम्यान, याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वयात 5 बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बर्ट आयर्नमॉंगर यांच्या नावावर होता. आयर्नमॉंगर यांनी 1932 मध्ये मेलबर्न येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वयाच्या 49 व्या वर्षी एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले होते. त्याने 18 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. तब्बल 94 वर्षे हा विक्रम अबाधित होता. हा विक्रम आता हिक्स यांनी मोडला आहे.
9 गडी राखून विजय
इल्फोन काऊंटी येथील मोरा व्लासी क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात आयल ऑफ मॅनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोआन हिक्स यांनी ग्रीसच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. हिक्सच्या दमदार गोलंदाजीमुळे ग्रीसचा संपूर्ण डाव 15 षटकात 52 धावांमध्ये आटोपला. त्यानंतर हे छोटे आव्हान 6 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात 56 धावा करत पूर्ण केले आणि 9 गडी राखून मोठा विजय मिळवला. जोआन हिक्स यांना ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चाळीशीनंतर पदार्पण अन् दमदार कामगिरी
जोआन हिक्स यांची ही कामगिरी अधिक खास ठरते कारण त्यांनी वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेल्या तीन वर्षांत त्यांनी संघातील सर्वात विश्वासू गोलंदाज म्हणून स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे 5 बळी घेण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. ऑगस्ट 2024 मध्ये माल्टाविरुद्ध त्यांनी 49 वर्षे आणि 162 दिवस वयात 5 बळी घेण्याची कामगिरी केली होती. तसेच ग्रीसविरुद्ध 22 धावांत 5 बळी घेतले होते.
Comments are closed.