2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये तिलक वर्माची एंट्री? गिल-गंभीर आणि आगरकरांचा खास प्लॅन

वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघांचा एकदिवसीय विश्वचषक पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये खेळला जाणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ तयारीला लागले असून भारताच्या निवड समितीने मोठा निर्णय घेतला आहे. ते संघाच्या मिडल ऑर्डरसाठी पर्यायी खेळाडू शोधत असून श्रेयस अय्यरच्या जागी संभाव्य खेळाडू म्हणून तिलक वर्माचे नाव समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांना असे वाटते की मधल्या फळीसाठी पर्यायी खेळाडूंच्या विचारात आहेत. अशात श्रेयसचा पर्याय म्हणून तिलकचे नाव समोर आले आहे.

तिलकच का? तो एक डावखुरा फलंदाज आहे आणि भारतीय संघाच्या आघाडी फळीमध्ये उजव्या हाताचे अनेक फलंदाज आहेत. अशा स्थितीत डावखुरा तिलक उत्तम पर्याय आहे. तसेच त्याची ऑफ-ब्रेक गोलंदाजीही संघासाठी उपयोगी ठरू शकते. काही वृत्तानुसार, तिलकला त्याच्या गोलंदाजीवर आणखी काम करण्यास सांगितले आहे.

मिडल ऑर्डरमध्ये बॅकअपची आवश्यकता?
बीसीसीआयच्या सूत्राने टीओआयला दिलेल्या माहितीनुसार,सततच्या दुखापतींच्या समस्या आणि युवा पर्यायांची फळी उभारण्याकडे भारताचा कल आहे. गंभीर आणि गिल यांना वाटते की, मधल्या फळीसाठी सध्या कोणताही सक्षम पर्यायी खेळाडू उपलब्ध नाहीत. त्यातच हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या दुखापतींच्या समस्यांमुळे संघात अधिक सखोल पर्याय असण्याची गरज वाढली आहे.

दक्षिण आफ्रिकेसारख्या स्थितीत भारताला अधिक पर्यायाची आवश्यकता आहे. श्रेयस ऑस्ट्रेलियामध्ये दुखापतग्रस्त झाला होता आणि दुखापतीतून सावरल्यानंतर त्याची उसळी घेणाऱ्या चेंडूंविरुद्ध टेस्ट झालेली नाही. तसेच संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अनुभवी खेळाडू आहेत, जे किरकोळ दुखापतींनी त्रस्त आहेत.

केएल राहुल हा पण एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. विश्वचषक स्पर्धेपर्यंत त्याचे वय 35 वर्षांपेक्षा अधिक होईल. तसेच या स्पर्धेसाठीच्या संघात रवींद्र जडेजाचे स्थान निश्चित नाही. त्याच्या फिटनेसमुळे संघाच्या क्षेत्ररक्षणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे संघ युवा पर्यायांची फळी उभारण्याच्या प्रयत्नात आहे.

भारताचे विश्वचषक नियोजन
या स्पर्धेची तयारी पाहिली तर, भारताच्या तयारीची सुरूवात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्याने होणार आहे. त्याआधी मायदेशात 27 सप्टेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे, ज्यासाठी बहुतेक खेळाडू उपलब्ध नसणार. कारण त्यावेळी संपूर्ण टी20 संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होणार आहे. (Tilak Varma is in Team India Plan for 2027 ODI World Cup selectors looking middle order backup options)

Comments are closed.