सामन्याच्या मध्यात वैभव सूर्यवंशीकडे कर्णधारपदाची धुरा, ईशान किशन दुखापतीमुळे मैदानाबाहेर

यंदाच्या दुलीप ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना सध्या ‘ईस्ट झोन’ आणि ‘सेंट्रल झोन’ यांच्यात सुरू आहे. ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले.

ईशानच्या जाण्यानंतर, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने संघाचे नेतृत्व स्वीकारले. वैभवची 2026च्या दुलीप ट्रॉफीसाठी ईस्ट झोन संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

डावाच्या 19 व्या षटकात ईशान किशनला दुखापत झाली. यष्टीरक्षण करत असताना चेंडू त्याच्या उजव्या मनगटावर लागला. चेंडू लागल्यामुळे वेदना होऊ लागल्याने त्याने फिजिओची मदत घेतली आणि उपचारांसाठी त्याला मैदान सोडावे लागले.

ईशानच्या अनुपस्थितीत कुमार कुशाग्राने यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान, 19व्या षटकापासून 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने ईस्ट झोन संघाचे कर्णधारपद सांभाळले. आता ईशान किशन दुखापतीतून कधी सावरतो आणि मैदानात कधी परततो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची वैभव सूर्यवंशीची ही पहिलीच वेळ आहे. अवघ्या 15व्या वर्षी, वैभव त्याचा केवळ दुसरा दुलीप ट्रॉफी सामना आणि एकूण दहावा प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. त्याने यापूर्वी 2024च्या सुरुवातीला रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि इतक्या लहान वयात खेळण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.

नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात वैभवला फलंदाजीमध्ये विशेष छाप पाडता आली नाही. 8 चेंडूत 6 धावा करून तो बाद झाला. मात्र, गोलंदाजी करताना त्याने दोन विकेट्स मिळवले.

ईस्ट झोन संघाने उपांत्य सामन्यासाठी आपल्या ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मागील सामन्यातील नायक ठरलेल्या शाहबाज अहमदला या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी कुनैन कुरेशीला संधी देण्यात आली आहे.

Comments are closed.