वैभव सूर्यवंशीने ‘वनडे स्टाईल’ अर्धशतक करत 57 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला! दुलीप ट्रॉफीमध्ये शतक थोडक्यात हुकले

बंगळुरूमध्ये दुलीप ट्रॉफी 2026 चे उपांत्य फेरीचे सामने सुरू आहेत. यातील पहिला उपांत्य फेरीचा सामना सेंट्रल झोन विरुद्ध ईस्ट झोन यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये सोमवारी (31 ऑगस्ट) ईस्ट झोनचा उपकर्णधार वैभव सूर्यवंशी याने 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या प्रथम श्रेणीच्या कारकिर्दीतील दुसरेच अर्धशतक ठरले असून त्याने एक विश्वविक्रमही नोंदवला आहे.

15 वर्षाच्या या खेळाडूने अभिमन्यू ईश्वरनसोबत सलामीला 162 धावांची भागीदारी केली. वैभव 81 चेंडूंत 7 चौकार आणि तेवढ्याच षटकारांच्या सहाय्याने 92 धावा करत बाद झाला. तो या स्पर्धेच्या इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

वैभवने दुलीप ट्रॉफीमध्ये वयाच्या 15 वर्ष आणि 157 दिवसांत अर्धशतक झळकावले आहे. त्याने 1969 मध्ये वयाच्या 16 वर्ष 23 दिवसांनी अर्धशतकी खेळी करणाऱ्या लक्ष्मण सिंग यांना मागे टाकले आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर पियुष चावला आहे. त्याने 2005 मध्ये वयाच्या 16 वर्ष 307 दिवसांमध्ये अर्धशतक केले होते.

याआधी वैभवने रणजी ट्रॉफीच्या मागील हंगामात अर्धशतक केले होते. मेघालयविरुद्ध त्याने 33 चेंडूंत 50 धावांचा टप्पा गाठला होता.

दुलीप ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावणारे सर्वात युवा खेळाडू
15 वर्ष 157 दिवस – वैभव सूर्यवंशी, 2026
16 वर्ष 23 दिवस – लक्ष्मण सिंग, 1969
16 वर्ष 307 दिवस – पियुष चावला, 2005

Comments are closed.