अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेआधी टीम इंडियासाठी ‘डबल गुड न्यूज’! बुमराह-हार्दिकबाबत मोठी अपडेट समोर, तर कृणालही संघात….

भारत सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. याआधी मोठी माहिती समोर आली आहे. संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीतून सावरत आहेत. हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी हे संघनिवडसाठी फिट असल्याचे मानले जात आहे. वरुण चक्रवर्तीही पूर्णपणे फिट असून वॉशिंग्टन सुंदरही फिटनेसच्या आवश्यक चाचण्या आणि मंजुरी मिळवण्याच्या जवळ आहे. यांमुळे भारतीय टी 20 संघ आणखीनच मजबूत होणार आहे.
आयर्लंड- इंग्लंड दौऱ्यात झालेल्या टी 20 भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर संघ व्यवस्थापनासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यातील महत्त्वाचे म्हणजे अष्टपैलूंचा पर्याय. आता हार्दिक आणि नितीश निवडीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्व दुखापतग्रस्त खेळाडूंनी बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये जोरदार सराव करत आहेत. दुखापतींनंनतर सर्व खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या इराद्याने पूर्ण क्षमतेने ट्रेनिंग करताना दिसले. या सर्वांमध्ये बुमराहही असून त्याच्या फिटनेसची चर्चा सर्वाधिक होत आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. सध्या तो CoE मध्ये असून ट्रेनिंग आणि रिहॅबिलिटेशन प्रक्रियेत आहे. भारताला येत्या काही महिन्यांत मोठ्या आणि महत्त्वाच्या कसोटी मालिका खेळायच्या आहेत. याच्या पार्श्वभुमीवर संघ व्यवस्थापन त्याची विशेष काळजी घेत आहेत.
बुमराहची प्रगती चांगली होत आहे. 2027 च्या विश्वचषकाच्या तयारीसाठी त्याने कसोटी आणि वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना होती, मात्र गुडघ्याच्या दुखातीमुळे व्यवस्थापन त्याला प्रथम टी 20 मधून हळूहळू पुनरागमन करण्याच्या विचारात आहेत. त्याच्या रिहॅबिलिटेशन प्रक्रियेत काही अडचण आली नाही, तर तो आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची दाट शक्यता आहे, असे एका सूत्राने सांगितले आहे.
कृणाल पंड्याची एंट्री?
भारताच्या टी 20 संघात आणखी बदल होणार आहेत. कृणाल पंड्याला संघात घेण्याच्या विचारात संघनिवडकर्ते असल्याची माहिती समोर येत आहे.
कृणालने 2021 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. आयपीएलमधील दोन दमदार हंगामांनंतर, निवडकर्ते या अनुभवी अष्टपैलू खेळाडूला पुन्हा टी 20 संघात समाविष्ट करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे.
तसेच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमधील अक्षरची कामगिरीही निराशाजनक झाली होती. यामुळे निवडकर्ते पर्यायी खेळाडूच्या शोधात आहेत. अशा स्थितीत कृणालचे नाव समोर येत आहे. त्याने आयपीएल 2026 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सलगच्या दुसऱ्या विजेतेपदामध्ये महत्त्वाची भुमिका बजावली होती.
अफगाणिस्तानविरुद्धची टी 20 मालिका कधी खेळली जाणार?
झिम्बाब्वेमध्ये 3-0 असा विजय मिळवल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय टी 20 संघाचा पुढील सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. तीन सामन्यांची ही मालिका 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर पुढील दोन सामने 15 आणि 17 सप्टेंबर रोजी खेळले जाणार आहेत. हे तिन्ही सामने अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळले जाणार आहेत.
Comments are closed.