शिमरॉन हेटमायरचे स्फोटक शतक; चौकारांपेक्षा मारले अधिक षटकार!

कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) शिमरॉन हेटमायरकडून एक वादळी आणि स्फोटक खेळी पाहायला मिळाली आहे. या सामन्यात त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. एवढेच नाही तर हेटमायरने अशी कामगिरी करून दाखवली आहे, जी यापूर्वी या स्पर्धेत एकाही फलंदाजाला करता आलेली नाही. याच कारणामुळे त्याचा संघ विजय मिळवण्यातही यशस्वी ठरला. दरम्यान, या सामन्याचा निकाल डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार लावण्यात आला.

​कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि गियाना ॲमेझॉन वॉरियर्स यांच्यात हा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना गियाना ॲमेझॉन वॉरियर्सने १६ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावा केल्या. मात्र, संघाला पहिला झटका लवकर बसला. ग्लेन फिलिप्स ४ चेंडूंत शून्य धावांवर बाद होऊन तंबूत परतला. इतर फलंदाजही लागोपाठ बाद झाले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी शिमरॉन हेटमायर मैदानात आला. त्याने येताच आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजीला सुरुवात केली.

​शिमरॉन हेटमायरने अवघ्या ४० चेंडूंत शतक झळकावले. डावाच्या अखेरपर्यंत तो ४३ चेंडूंत १११ धावा करून नाबाद राहिला. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ९ गगनचुंबी षटकार निघाले. त्याचा स्ट्राइक रेट २५८.१४ चा होता. विशेष म्हणजे, कॅरिबियन प्रीमियर लीगमधील हेटमायरचा हा १०० वा सामना होता. या स्पर्धेत आपल्या १०० व्या सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे. CPL मधील हेटमायरचे हे दुसरे शतक आहे. याशिवाय तो जगभरातील अनेक T20 लीगमध्ये खेळतो आणि शानदार कामगिरी करतो.

​गियाना ॲमेझॉन वॉरियर्सने दिलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रिनबागो नाइट रायडर्सचा संघ १६ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावाच करू शकला. अशा प्रकारे गियाना संघाने ९ धावांच्या फरकाने सामना जिंकण्यात यश मिळवले. गियाना ॲमेझॉन वॉरियर्सने आतापर्यंत चार सामने खेळले असून सर्व सामने जिंकून ८ गुण मिळवले आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

Comments are closed.