कोपरगावच्या अतिक्रमणधारकांना ‘अंतिम’ नोटीस, नगरपरिषदेची 3 सप्टेंबरपासून धडक मोहीम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोपरगाव शहरातील सार्वजनिक रस्ते आणि जागांवरील अतिक्रमणांचा प्रश्न वर्षानुवर्षे डोकेदुखी ठरला असताना कोपरगाव नगरपरिषदेने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून ‘अंतिम’ इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबरपासून शहरातील सर्व सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने जाहीर केले आहे. त्यामुळे आता तरी ही मोहीम केवळ काही दिवसांची कारवाई ठरणार की अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणार, हा खरा सवाल आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीने 31 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोटिसीद्वारे सार्वजनिक रस्त्याच्या जागेत किंवा हद्दीत अतिक्रमण केलेल्या नागरिकांना आपले अतिक्रमण तातडीने स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोटीसमध्ये 3 सप्टेंबरपासून शहरातील सर्व सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरपरिषदेने यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना संबंधित अतिक्रमणधारकांना स्वतंत्र नोटीस दिली जाणार नसल्याचे बजावले आहे. ही जाहीर नोटीसच अंतिम नोटीस समजण्यात यावी, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी होणारा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा स्पष्ट इशारा नोटिसीत देण्यात आला आहे.

Comments are closed.