साडेचार कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी हस्तगत; कसबे डिग्रजमध्ये छापा, घुणकीतील तरुणाला अटक

मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी घेऊन आलेल्या अमोल आकाराम सिद (वय 31, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 4 किलो 521 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. त्याची किंमत 4 कोटी 52 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. तपासात तस्करीचे ‘मालवण कनेक्शन’ स्पष्ट झाले असून, उलटीसदृश पदार्थ देणाऱ्या निखिलचा (पूर्ण नाव नाही) शोध सुरू आहे.

सांगली ग्रामीण पोलिसांना दोन दिवसांपूर्वी हद्दीतील कसबे डिग्रज गावातील ग्रीन पार्क प्लॉटिंगजवळ व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी एक तरूण येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस पथकाने ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांना हा प्रकार कळवला. त्यांनी तत्काळ अधिकारी व कर्मचारी यांना बोलवून कारवाईबाबत आदेश दिला.

उपनिरीक्षक शिवाजी देशमुख यांचे पथक सांगली ते ईश्वरपूर रस्त्यावरून बागणवाट रस्ता येथे गेले. त्यानंतर पथकाने पायी चालत जाऊन ग्रीन पार्कच्या बाजूला सापळा रचला. काही वेळाने दुचाकीवरून एक तरुण तेथे आला. प्लॉटजवळ ठेवलेल्या सिमेंटच्या बाकड्याजवळ थांबला. यावेळी पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अमोल सिद असे नाव सांगितले. त्याने दुचाकीला अडकवलेल्या पिशवीत पिवळसर रंगाचा आयताकृती घट्ट पदार्थाचे दोन नग आढळले. चौकशीत दोन्ही व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) असून, मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील निखिल (पूर्ण नाव नाही) याने विक्रीसाठी दिला असल्याचे सांगितले. एकूण 4 किलो 521 ग्रॅम उलटीसदृश पदार्थ जप्त केला असून, त्याची किंमत 4 कोटी 52 लाख 10 हजार रुपये इतकी आहे.

पोलीस उपअधीक्षक अजय कोकोटे यांनी भेट देऊन माहिती घेतली. निरीक्षक अभिजित देशमुख, उपनिरीक्षक देशमुख, अरुण औताडे, सहायक फौजदार मेघराज रूपनर, सचिन खाडे, महेश जाधव, अभिजित पाटील, हिम्मत शेख, योगेश यादव, अमित पाटील, वन विभागाचे कर्मचारी गणेश भोसले, वनरक्षक भोसे, सुधीर सोनवले, वनपाल भोसे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Comments are closed.