Nanded News – मसाज सेंटरवर छापा टाकत तीन आरोपींना अटक, सात पिडीत महिलांची सुटका

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराज्यीय देहव्यापाराच्या रॅकेटचा नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फुले मार्केट परिसरातील ‘वेलनेस स्पा’वर धडक कारवाई करून पोलिसांनी परराज्यांसह नेपाळमधील सात पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून स्पा मालक फरार आहे.

पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा तब्बल 1 लाख 71 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड शहरात मसाजच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कारवाईची केली.

पोलिसांनी दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत बोगस ग्राहक तयार केले. त्याला चिन्हांकित नोटा देऊन स्पामध्ये पाठविण्यात आले. बोगस ग्राहकाने दिलेल्या इशार्‍यानंतर पोलिसांनी स्पावर छापा टाकला. तपासणीदरम्यान महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणात हिफजुर रेहमान आरीफोद्दीन, रहाजोद्दीन रफिकोद्दीन आणि याहीया अहमद अब्दुल वाहीद यांना अटक करण्यात आली आहे. तर स्पा मालक संतोष बघे हा फरार झाला आहे. हे आरोपी आसाममधील होजाई, नगांव परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईत दिल्ली, ठाणे, पुणे तसेच नेपाळ, नागालँड आणि अन्य ठिकाणांहून आणलेल्या सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली. महिलांना पैशांचे आमिष दाखवून या अनैतिक व्यवसायात ढकलल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच देहव्यापारासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण 1,71,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार स्पा मालकाचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments are closed.